नगर पंचायतीत सर्वांचीच दाणादाण
By Admin | Updated: November 3, 2015 02:16 IST2015-11-03T02:16:56+5:302015-11-03T02:16:56+5:30
जिल्ह्यातील सहापैकी चार नगर पंचायतींसाठी रविवारी झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर

नगर पंचायतीत सर्वांचीच दाणादाण
गोंदिया : जिल्ह्यातील सहापैकी चार नगर पंचायतींसाठी रविवारी झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निकालांनी सर्वच राजकीय पक्षांची दाणादाण केली. कोणत्याही राजकीय पक्षाला कुठेही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे मतदारांमध्ये असलेली संभ्रमावस्था दिसून आली. मात्र देवरी आणि सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने मतदारांचा राष्ट्रवादीला कौल असल्याचे स्पष्ट झाले. गोरेगावात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून अर्जुनी मोरगाव येथे भाजप आणि काँग्रेसला सर्वाधिक सारख्याच जागा मिळाल्या आहेत.
चारही नगर पंचायती मिळून एकूण ६८ जागांपैकी भाजपला २४, राष्ट्रवादी काँग्रेसला १६, काँग्रेसला १५, शिवसेनेला १ आणि अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत.
अर्जुनीत अनेकांचे अंदाज चुकले
अर्जुनी-मोरगाव : नगर पंचायतच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येथे सत्ता स्थापन्याचा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसला ६, भाजप ६, राष्ट्रवादी काँग्रेस २, अपक्ष २ व शिवसेनेला १ जागा मिळाली आहे.
वार्ड क्रमांक १ मधून शहारे पौर्णिमा कृष्णा, वार्ड २- शहारे वंदना मन्साराम, वार्ड ३- शहारे किशोर माधवराव, वार्ड ४ - जुगनाके उर्मिला यादव, वार्ड ५- ब्राम्हणकर गीता गोविंदराव, वार्ड ६- ब्राम्हणकर यमू देविदास, वार्ड- घनाडे माणिक शामराव, वार्ड ८- जांभुळकर वंदना युवराज, वार्ड ९ - गणवीर प्रज्ञा प्रदीप, वार्ड १०- टेंभरे देवेंद्र मन्साराम, वार्ड ११- घाटबांधे हेमलता पुरूषोत्तम, वार्ड १२- जयसवाल मुकेश शिवप्रसाद, वार्ड १३- कापगते विजय नामदेव, वार्ड १४- मसराम माणिक बकारामजी, वार्ड १५- शहारे प्रकाश तुकाराम, वार्ड १६- पवार ममता संजयसिंह, वार्ड १७- शहारे यशकुमार ज्ञानदेव हे विजयी झालेत.
नगर पंचायतसाठी प्रथमच निवडणूक झाल्याने मतदार व उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. काँग्रेस, भाजप व राकाँ पक्षाने संपूर्ण १७ जागांवर तर शिवसेनेने १० जागांवर उमेदवार उतरवले होते. प्रत्येक प्रभागात शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरस होती. राजकीय पंडीत आपापल्या पध्दतीने भाकीत वर्तवित होते, मात्र बरेचसे अंदाज चुकले. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे नैराश्यापोटी दंड थोपटून उमेदवारी कायम ठेवणाऱ्या बंडखोरांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे गणित बिघडविले. या निवडणुकीत पक्षशक्तीपेक्षा धनशक्तीचा सुध्दा मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसून आला. या निवडणुकीत डॉ.वल्लभदास भुतडा, शशीकला भाग्यवंत, राकेश शुक्ला, नवीन नशिने, अरुण मांडगवणे, वर्षा घोरमोडे हे दिग्गज उमेदवार पराभूत झाले. माणिक घनाडे व यशकुमार शहारे हे मात्र तरले. इतर सर्व उमेदवार प्रथमत:च निवडून आले आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी जोडतोडचे राजकारण सुरू झाले आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष तसेच शिवसेना उमेदवाराची मदत घ्यावी लागणार आहे. ऐनवेळी भाजप-काँग्रेस अशी सुध्दा युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे भाजपचे आहेत. हे विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र येथे अनु.जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पाच जागांपैकी तीन जागांवर काँग्रेस तर प्रत्येकी एका जागेवर राकाँ व भाजपचे उमेदवार निवडून आले हे विशेष.
देवरीत सत्ता कुणाची?
देवरी : ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झालेल्या देवरीत पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत भाजपला ७, राकाँला ८, काँग्रेस १ व अपक्षला १ जागा मिळाल्या आहेत. आता सत्ता कोणाच्या हाती येणार याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे. भाजपला २ तर राकाँला केवळ एका सदस्याची गरज आहे. यात यादोराव पंचमवार (अपक्ष) कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण सध्या जाहीर झालेले नाही. परंतु नगराध्यक्ष महिला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१७ जागांकरीता १०४ उमेदवार मैदानात होते. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून राकाँचे नेमीचंद आंबीलकर, प्रभाग २ मधून भाजपचे प्रवीण दहीकर, प्रभाग ३ मधून राकाँचे रितेश अग्रवाल, प्रभाग ४ मधून भाजपच्या कौशल्या कुंभरे, प्रभाग ५ मधून भाजपच्या कांता भेलावे, प्रभाग ६ मधून राकाँच्या माया निर्वाण, प्रभाग ७ मधून राकाँच्या दवीदरकौर भाटीया, प्रभाग ८ मधून राकाँच्या सुमन बिसेन, प्रभाग ९ मधून राकाँचे अन्नुभाई शेख, प्रभाग १० मधून काँग्रेसचे ओमप्रकाश रामटेके, प्रभाग ११ मधून भाजपच्या कोकीळा दखने, प्रभाग १२ मधून भाजपचे संजू उईके, प्रभाग १३ मधून भाजपच्या भूमिता बागडे, प्रभाग १४ मधून राकाँच्या सीता रंगारी, प्रभाग १५ मधून अपक्ष यादोराव पंचमवार, प्रभाग १६ मधून भाजपचे संतोष तिवारी, प्रभाग १७ मधून राकाँच्या हेमलता कुंभरे विजयी झाल्या.
गोरेगावात दिग्गज पडले तोंडघशी
गोरेगाव : गोरेगाव नगर पंचायतीत भाजपला ७, काँग्रेसला ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र कपबशी चिन्हावर लढणाऱ्या नगर विकास पॅनलला चार जागा मिळाल्या. कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळणार नाही, मतदारांनी अनेक दिग्गजांना पाणी पाजले तर नवख्यांना संधी दिली.
वार्ड क्र.१३ मधून माजी जि.प. सदस्य जगदिश येरोला यांना पराभवाचा सामना करावा लागला. सर्वांचे लक्ष या वॉर्डकडे लागले होते. या वॉर्डातून दिग्गज उमेदवार उभे होते. वार्ड क्र. १३ मध्ये चुरशीची लढाई झाली. या वार्डात उमेदवारांनी लाखो रुपये खर्च करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. १७ वॉर्डात झालेल्या लढतीत ७ ठिकाणी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
गोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व नगर विकास पॅनलने १७ उमेदवार उभे केले होेते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत मतदारांनी नवख्या उमेदवारांना संधी देत भाजपला सर्वाधिक कौल दिला.
या निवडणुकीत नगर विकास पॅनलचे नेतृत्व करणारे लक्ष्मीकांत बारेवार यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.रुस्तम येळे विजयी झाले.
भाजप-काँग्रेसचा पुन्हा जुना फॉर्म्युला?
४जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने हातात हात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी खेळली. त्यात ते यशस्वीही झाले. आता नगर पंचायतीत सत्ता प्राप्तीसाठी तीच खेळी पुन्हा खेळली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान एकमेकांवर आगपाखड करीत मतदारांना आपल्याच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करणारे पक्ष पुन्हा मतदारांच्या नाकावर टिच्चून एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यात काय होते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. जर असे झाल्यास पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळूनही राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित राहावे लागू शकते.