जीर्ण बांधकामांची माहिती नगर परिषदेकडे नाही !
By Admin | Updated: July 22, 2016 02:33 IST2016-07-22T02:33:24+5:302016-07-22T02:33:24+5:30
पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण झालेल्या इमारती कधीही कोसळून अपघात घडण्याची शक्यता असते.

जीर्ण बांधकामांची माहिती नगर परिषदेकडे नाही !
नगररचना विभाग झोपेत : पालिका प्रशासनही अनभिज्ञ
गोंदिया : पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण झालेल्या इमारती कधीही कोसळून अपघात घडण्याची शक्यता असते. शहरातील अशा जीर्ण बांधकामांची अद्ययावत स्थिती व त्यावर उपाययोजना करणे आणि संभाव्य अपघात टाळणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र गोंदियात उलट कारभार सुरू आहे. नगर परिषद प्रशासनाला याचे काहीच घेणे-देणे नसून नगररचना विभागाचेही सपशेल दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे नगर रचना विभागाकडे शहरातील जीर्ण बांधकामांचा रेकॉर्डच नसल्याची माहिती आहे.
एखादी इमारत पडून जीवित हानी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात व टिव्हीवर बघावयास मिळतात. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या घटना पावसाळ््यात जास्त प्रमाणात घडतात. शहरातही असे काहीसे प्रकार घडले आहेत. असे प्रकार घडू नये व जीर्ण इमारती पडून कुणाचा जीव जाऊ नये याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर असते. मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेला यासाठी विभाग निहाय पथक तयार करून जीर्ण इमारतींची माहिती संकलीत करावयाची असते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्याचे शिवाय गरज पडल्यास धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई करावी लागते. विशेष म्हणजे यासाठी नगर रचना विभागासाठी तसे काही अधिकार देण्यात आले आहेत. नगर परिषदेत मात्र गंगा उलट्या दिशेने वाहत असल्याचे दिसते. (शहर प्रतिनिधी)