प्रेमाची चर्चा गावात होऊ नये म्हणून केला तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:21 IST2021-04-29T04:21:44+5:302021-04-29T04:21:44+5:30
गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पूरगाव येथील तीन तरुणांनी एका तरुणाचा चाकूने मारून खून केल्याची घटना ...

प्रेमाची चर्चा गावात होऊ नये म्हणून केला तरुणाचा खून
गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पूरगाव येथील तीन तरुणांनी एका तरुणाचा चाकूने मारून खून केल्याची घटना २६ एप्रिलच्या दुपारी ४ ते ४.३० वाजता पूरगाव येथील शिवारावर घडली. सुशील योगराज पारधी (१८, रा. पूरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पूरगाव येथील आरोपी निखिल ओमप्रकाश खिरेकर (२०) याचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याची कल्पना मृतक सुशील याला होती. सुशील गावात आपली बदनामी करेल अशी धास्ती आरोपी निखिलला असल्यामुळे त्याने सुशीलला या जगातूनच उठवायचा चंग बांधला. या कामासाठी त्याने आपल्या अन्य दोन मित्रांची मदत घेतली. रोहित राजेंद्र राहुलकर (१९), सागर संजय मेश्राम (१९, दोन्हीही रा. पिरगाव) अशी त्यांची नावे आहेत. या तिन्ही आरोपींनी २६ एप्रिलच्या दुपारी ४ वाजता सुशीलचा काटा काढण्याचे ठरवले. सुशील हा नेहमीप्रमाणे घरच्या बकऱ्या घेऊन आपल्या वडिलोपार्जित शेतात चारण्याकरिता गेला असता तिन्ही आरोपींनी त्याच्या गळ्यावर, छातीवर, पाठीवर व मानेवर चाकूने सपासप वार करून ठार केले. सुनीता योगराज पारधी (२१) यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या आरोपींना ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे करीत आहेत.