चुरडीत एकाच कुटुंबांतील चौघांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST2021-09-22T04:32:54+5:302021-09-22T04:32:54+5:30

तिरोडा (गोंदिया) : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२०) रात्री ...

Murder of four members of the same family in Churdi | चुरडीत एकाच कुटुंबांतील चौघांचा खून

चुरडीत एकाच कुटुंबांतील चौघांचा खून

तिरोडा (गोंदिया) : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२०) रात्री घडली. एकाच कुटुंबातील चौघांचा खून झाल्याने या गुन्ह्यात अनेक आरोपींचा समावेश असावा, असा कयास लावला जात आहे. रेवचंद डोंगरू बिसेन (५१), त्यांची पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७), अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत.

रेवचंद डोंगरू बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोअर व एक ट्रॅक्टर असून, ते रेशनचे धान्य ट्रान्स्पोर्ट करण्याचे काम करीत होते. मंगळवारी (दि.२१) पहाटे बिसेन यांच्या घरात अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या सदस्यांवर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने डोक्यावर वार करून ठार केले. यात मालता बिसेन या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या हाेत्या. पौर्णिमा बिसेन व तेजस बिसेन (१७) हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर रेवचंद बिसेन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून होता. गळफास लावलेला दोर दारातून खिडकीला बांधून ठेवला होता.

यात आरोपींनी हा खून नाही, आत्महत्या वाटावी, यासाठी रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत नियोजनबद्ध पद्धतीने लटकवून ठेवला होता. या घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे घटनास्थळावर दाखल झाले. मारण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचा स्पेंडल घटनास्थळपासून घराच्या ाव्हरांड्यातच १५ फूट अंतरावर फेकलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

..................

९० वर्षांची म्हातारीच राहिली जिवंत

रेवचंद बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन या ९० वर्षांच्या असून, पक्षाघाताने ग्रस्त आहेत. त्या समोरच्या खोलीत आपल्या खाटेवर झोपल्या होत्या. आरोपी मागील दारातून आले आणि त्यांनी या चौघांना संपविले तरी खेमनबाई यांना या घटनेचा सुगावा नसावा. या म्हाताऱ्या खेमनबाई यांना या घटनेबाबत काय माहिती आहे, यावरूनही पोलीस धागेदोरे जोडतील.

-----------------------

वाहन चालकामुळे उघडकीस आले प्रकरण

रेवचंद बिसेन यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करीत असलेला प्रताप रहांगडाले मंगळवारी (दि.२१) सकाळी १० वाजता वाहनाची चाबी घेण्यासाठी आला असता त्याला घरात चार मृतदेह दिसून आले. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. एकाच कुटुंबातील चौघांचा खून हा व्यवसायातून झाला की, संपत्तीतून झाला, हे सांगता येत नाही. आतापर्यंत या खुनांचा उलगडा झाला नाही.

....

Web Title: Murder of four members of the same family in Churdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.