नगरपालिकेला स्वच्छतेचा विसर
By Admin | Updated: October 20, 2014 23:16 IST2014-10-20T23:16:10+5:302014-10-20T23:16:10+5:30
जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यात शहर हरवून

नगरपालिकेला स्वच्छतेचा विसर
गोंदिया : जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यात शहर हरवून गेले की काय? असे वाटत आहे. लक्षावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या शहराची ही दुरवस्था शहराच्या विद्रुपतेत भर घालत आहे. त्यातही स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाला विसर पडला आहे. पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत नो टेंशन आहे काय, असेच वाटते.
अगदी बाराही महिने अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात नगर परिषदेने स्वच्छता मोहीम राबवून बऱ्यापैकी साफसफाई केली होती काय हे पण निश्चितपणे कुणी सांगू शकत नाही. आज स्वच्छता केली तर दुसऱ्या दिवशी
शहराचे रस्ते पुन्हा कचऱ्याने माखू लागते. शहरातील रस्त्यांवर कचराच कचरा दिसून येतो. सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावर किती कचरा साचलेला आहे याची कल्पनाच येत नाही. शहरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसतात.
कापडाच्या तसेच विविध वस्तूंच्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची पॅकिंग असणारे पुठ्ठे, प्लास्टिकचे कव्हर, कागदी कव्हर, छोट्या कॅरीबॅग असा कितीतरी प्रकारचा कचरा रस्त्यावर साचलेला दिसत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर नागरिकांनी टाकलेला हा कचरा कमी होता म्हणून की काय प्रत्येक दुकानदाराने दुकानातून निघालेल्या कचऱ्याचा ढिगारा दुकानासमोरच लाऊन ठेवलेला दिसतो. कधी कधी हा ढीग एका ठिकाणी गोळा केला जातो. रस्त्यावर विखुरलेला कचरा आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढिगारे पाहून शहर कचऱ्यात हरविल्याचा भास होत आहे.
मात्र या कचऱ्याची सवय असणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. किमान आपल्या दुकानासमोर तरी कचरा राहू नये म्हणून त्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याची तसदी घेताना कोणीही दिसत नाही.
सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्वच आपल्या घरे व दुकानांची सफाई करून निघणारा कचरा रस्त्यांवर टाकून मोकळे होत आहे. यामुळेच बाजारपेठ तर सोडाच रहिवासी भागातही जागोजागी कचरा पसरलेला दिसून येत आहे. मात्र दिवाळी आता ेका दिवसावर असूनही पालिकेकडून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आली नसल्याचेच दिसून येते. परिणामी बघावे तेथे कचराच कचरा पडून असल्याचे चित्र आहे.
गणपती व नवरात्री तर कचऱ्याच्या ढिगारांतच निघून गेली. किमान दिवाळी बघता तरी पालिकेने स्वच्छता करावी अशी मागणी शहरवासी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)