मुंंबईच्या आॅडिटर्सने केली तहसील कार्यालयात झाडाझडती
By Admin | Updated: November 30, 2014 23:06 IST2014-11-30T23:06:28+5:302014-11-30T23:06:28+5:30
दुहेरी अर्थ संकल्प वितरण प्रणाली (व्हीडीएस) चा उपयोग करुन दोन कोटी ५५ लाख रुपयांचा अपहार करणारे येथील तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुनील खुशाल वैरागडे व नाझर नागदेव शंकर बुट्टे

मुंंबईच्या आॅडिटर्सने केली तहसील कार्यालयात झाडाझडती
देवरी: दुहेरी अर्थ संकल्प वितरण प्रणाली (व्हीडीएस) चा उपयोग करुन दोन कोटी ५५ लाख रुपयांचा अपहार करणारे येथील तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुनील खुशाल वैरागडे व नाझर नागदेव शंकर बुट्टे यांच्या कार्यकाळात झालेल्या अन्य अपहारांची चौकशी करण्यासाठी मुंबईचे आॅडिटर धडकले. त्यांनी कार्यालयात कसून चौकशी केली असून काही कागदपत्र सील केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील अन्य विभागांत १९९७ पासून २०१४ पर्यंत कोट्यवधींचा घोळ झाल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई वित्त विभागाच्या उपसंचालकांच्या नेतृत्वातील चमूने १५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान एकुण १४ दिवस वैरागडे यांच्या कार्यकाळात त्यांनी काम केलेल्या विविध विभागांची चौकशी केली. या तहसील कार्यालयात वैरागडे हे १७ वर्ष कार्यरत होते व त्यांच्याकडे या काळात आस्थापना, संजय गांधी निराधार, नाझर व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन हे विभाग होते. या प्रत्येक विभागात त्यांनी घोळ केला असल्याचे वर्तविले जात असून हा घोळ सुमारे तीन ते पाच कोटींच्या घरात असल्याची चर्चा सुरू आहे.
याआधी वैरागडे व बुट्टे यांच्या विरुद्ध तसीलदार चव्हाण यांनी देवरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती व नाझर बुट्टे यांना त्यांच्या गृहग्रामातुन अटक करण्यात आली होती. तीन महिने न्यायालयीन कोठडीत राहुन वैरागडे यांना जामीन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे वैरागडेच्या १७ वर्षाच्या कार्यकाळात कार्यरत असलेल्या १९ तहसीलदारांवर गाज येण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. यातील बहुतेक सेवामुक्त झालेले आहेत. आता १९९७ ते २०१४ पर्यंत आणखी किती गैरव्यवहार कार्यालयात झाले व याला कोण जबाबदार होते, याचा खुलासा लेखा विभागाच्या चौकशी अहवालातून उघडकीस येणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)