तिरोडा तालुक्याची चाल विकासाकडे
By Admin | Updated: December 10, 2014 23:00 IST2014-12-10T23:00:27+5:302014-12-10T23:00:27+5:30
तिरोडा तालुक्यातील काही भागाचा आता औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत तिरोडा हे शहर जिल्ह्यात अग्रक्रमांकावर येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.

तिरोडा तालुक्याची चाल विकासाकडे
काचेवानी : तिरोडा तालुक्यातील काही भागाचा आता औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत तिरोडा हे शहर जिल्ह्यात अग्रक्रमांकावर येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. येत्या फेब्रुवारी-मार्चअखेर सिमेंट प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यापूर्वी प्रथमत: तिरोडा तालुका विकासाच्या मार्गावर, एलएनटी सहीत काही उद्योग स्थापित होण्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले होते. तिरोडा तालुक्याच्या काचेवानी-बरबसपुरा-मेंदीपूर या परिसरात सिमेंट प्रकल्प स्थापित होणार असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. मात्र हे प्रकल्प अदानीचे की एल अॅन्ड टीचे हे निश्चित कळू शकले नाही.
स्थापित होणारे सिमेंट प्रकल्प २०१५ च्या मार्च अखेर सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असली तरी परिसरातील ग्रामपंचायतींशी संपर्क करण्यात आले असता अधिकृत माहिती किंवा प्रकल्प उभारण्यासंबधीचे पत्र प्राप्त झाले नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र काही ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी सिमेंट प्रकल्प स्थापित होणार असल्याची माहिती सत्य असल्याचे मान्य केले आहे.
यापूर्वी लोकमतने उद्योगासंबंधी वृत्त प्रकाशित केले. त्यावेळी एल अॅन्ड टी सिमेंट प्रकल्प या परिसरात स्थापित होणार असल्याचे भाकित केले होते. काचेवानीचे प्रतिष्ठित नागरिक उमाशंकर चौधरी यांनी या माहितीला दुजोरा देत सांगितले होते की, २० ते २५ वर्षापूर्वी या परिसरात एलएनटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्वे केले होते. मात्र हे प्रकल्प थंडबस्त्यात पडून होते.
तिरोडा परिसरात अदानी प्रकल्प स्थापित करण्यात आले.
नेमक्या या परिसरातच कसे काय आले, यावरून सिमेंट प्रकल्पाला गती मिळालेली आहे. सिमेंट प्रकल्पाला पाणी, वीज आणि राखड या ती वस्तूंची गरज असते. या तिन्ही वस्तू अदानीजवळ उपलब्ध आहेत. त्यामुळे हे प्रकल्प निर्माण होण्यास अडथळा उरला नाही, असे बोलले जात आहे. अर्थातच सिमेंट प्रकल्प उभारणार असल्याच्या माहितीला गती मिळाली असून दोन ते तीन महिन्यात या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. अदानी प्रकल्पातून टाकावू वस्तू, राखड भरपूर प्रमाणात तयार होत असून त्यांचा विल्हेवाट कोठे लावायचा, हा प्रसंग अदानीसमोर भविष्यात निर्माण होणार आहे. याकरिता सिमेंट प्रकल्प उपयुक्त ठरणार, असे बोलले जाते.