तुडतुड्याच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 23:33 IST2018-09-20T23:32:44+5:302018-09-20T23:33:18+5:30
शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत आहे. सावकाराकडून उसने घेवून खत, किटकनाशके शेतकऱ्यांनी खरेदी केली. मागील वर्षी तुडतुड्याने नुकसान केले. त्याची भरपाई देण्याचे कबूल केले. परंतु ती भरपाईची रक्कम अद्याप बँकेत जमा झाली नाही.

तुडतुड्याच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत आहे. सावकाराकडून उसने घेवून खत, किटकनाशके शेतकऱ्यांनी खरेदी केली. मागील वर्षी तुडतुड्याने नुकसान केले. त्याची भरपाई देण्याचे कबूल केले. परंतु ती भरपाईची रक्कम अद्याप बँकेत जमा झाली नाही.या संवेदनशून्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अर्जुनी-मोरगाव राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शहारे यांनी दिला आहे.
भाजपा सरकारमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. धानाच्या समर्थन मुल्यात वाढ म्हणजे उंटाच्या तोंडात जिरा आहे. शेतकऱ्यांनी स्वत: जवळील होते नव्हते पैसे धान रोवणीत खर्च केले. आता धानपिकावर रोगकिडीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांकडे कीटकनाशके, खते, निदंनासाठी पैसे उरले नाही. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची दारोदार भटकंती सुरु आहे. आॅनलाईनच्या छळापायी शेतकरी रेशनापासून वंचित आहेत.
तुडतुड्याची नुकसान भरपाई कित्येक शेतकऱ्यांना मिळाली नाही. तालुक्यातून दूरवरुन शेतकरी बँकेत विचारणा करण्यासाठी येतात. परंतु यादी तहसील कार्यालयातून आलीच नाही असे उत्तर मिळते. तहसील कार्यालयात गेले तर संबंधित अधिकारी, कर्मचारी यादी पाठवितो, त्रुटी आहे असे अनेक कारणे सांगून टाळतात. मागील काही दिवसापासून संबंधित लिपीक सुटीवर आहे. तहसीलदार लक्ष देत नाही. यामुळे त्रस्त झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पालक मंत्र्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. नुकसान भरपाईची यादी त्वरित बँकेकडे देऊन ती रक्कम खात्यात जमा करावी. शेतकऱ्यांची टोलवाटोलवी बंद करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोहर शहारे यांनी दिला आहे.