डोंगर तलाव व पिंडकेपार बागेची पाहणी

By Admin | Updated: June 10, 2017 02:09 IST2017-06-10T02:09:13+5:302017-06-10T02:09:13+5:30

केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत आता विकासाची दारे उघडण्यात आली असून यात गोंदिया शहराचा समावेश करण्यात आला आहे.

Mountain lake and Pindekar Park Survey | डोंगर तलाव व पिंडकेपार बागेची पाहणी

डोंगर तलाव व पिंडकेपार बागेची पाहणी

हरित क्षेत्र विकास प्रकल्प : नवनियुक्त एजन्सीकडून झाली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत आता विकासाची दारे उघडण्यात आली असून यात गोंदिया शहराचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईच्या नवनियुक्त एजंसीकडून डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेची पाहणी करण्यात आली. आता एजंसीकडून या बागांच्या सौंदर्यीकरणाचे डिझाईन तयार करून नगर परिषदेला पाठविले जाईल व तसा प्रस्ताव नगर परिषदेकडून शासनाकडे सादर केला जाईल. याला मंजूरी मिळाल्यास शहरातील बाग व तलावाला सौंदर्यीकरणाचे ‘अमृत’ मिळणार.
गोंदिया शहराचा सर्वच क्षेत्रात विकास होत असला तरिही हरित क्षेत्राच्या बाबतीत शहर मागासलेलेच आहे. आजघडीला शहरात सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हे एकच बाग उरले असून याशिवाय दुसरे हिरवळीचे स्थान नाही. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी सुभाष बागेचीही स्थिती काही बरी नाही. नगर परिषदेकडून बागेला रेटत चालल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरवासीयांना मोकळ््या हवेत श्वास घेण्यासाठी दुसरी जागाच उरलेली नाही. बागेत कित्येक वर्षांपूर्वी लागलेले मोजके जुनेच खेळणे लागलेले आहेत. त्यामुळे चिमुकल्यांचाही बागेत येऊन हिरमोडच होतो. याकरिता पालिकेकडून आता शहरात काही बागांची निर्मिती केली जात आहे.
मात्र आता सुभाष बागेसह शहरात नव्याने तयार होत असलेल्या पिंडकेपार व कुडवा येथील बागांचाही विकास होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सात सल्लागार समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात गोंदिया शहरासाठी दिल्ली येथील ‘ओसीस डिजाईन’ या एजंसीची नेमणूक करण्यात आली होती. एजंसीचे कर्मचारी वरूण सैनी यांनी सुभाष बाग, कुडवा व पिंडकेपार येथील बागांची पाहणी करून त्यांचे छायाचित्र काढून नेले होते.
मात्र ओसीस डिजाईन या एजंसीने काही कारणास्तव काम करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे काम मुंबईच्या टंडन कंसल्टंसी यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यानुसार या एजंसीचे कर्मचारी विकास भालेराव गुरूवारी (दि.८) गोंदियात आले होते. या दौऱ्यात त्यांनी शहरातील पिंडकेपार येथील बाग तसेच डोंगर तलावची पाहणी करून त्यांचे फोटो काढले आहेत.
तसेच त्यांनी या बाग व तलावा संबंधीत जुनी माहिती, डी.पी.प्लान, लीड चार्ट यासह आवश्यक ते कागदपत्र नगर परिषदेकडून घेतले आहेत. येथून संकलीत केलेली ही सर्व माहिती भालेराव आता त्यांच्या एजंसीकडे देणार असून एजंसीकडून या बाग व तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी डिजाईन्स तयार केले जातील.
ते डिजाईन्स एजंसी गोंदिया नगर परिषदेला पाठविणार आहे व नगर परिषद त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणार आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास शहरातील या बाग व तलावाचा कायापालट होणार असून एकप्रकारे त्यांना ‘अमृत’च मिळणार असल्याचे म्हणता येईल.

एक कोटींच्या वार्षिक निधीची तरतूद
‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पासाठी एक कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बागांच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी मिळाल्यास बागांच्या सौंदर्यीकरण व देखभाल दुरूस्तीसाठी नगर परिषदेला दरवर्षी एक कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती आहे. एवढा निधी मिळत असल्यास येथील बागांचे व या तलावाचे चित्र काय राहणार याची कल्पना करता येते.

 

Web Title: Mountain lake and Pindekar Park Survey