तिरोडा तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी
By Admin | Updated: September 19, 2015 02:55 IST2015-09-19T02:55:28+5:302015-09-19T02:55:28+5:30
जिल्हाभरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासल्यानंतर त्यात तिरोडा तालुक्यातील गावांमध्ये सर्वाधिक प्रदुषित पाणी आढळले आहे.

तिरोडा तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी
अर्जुनी मोरगाव स्वच्छ : २३५ अस्वच्छ गावांना पिवळे कार्ड
गोंदिया : जिल्हाभरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासल्यानंतर त्यात तिरोडा तालुक्यातील गावांमध्ये सर्वाधिक प्रदुषित पाणी आढळले आहे. तर सर्वात स्वच्छ पाणी अर्जुनी मोरगाव तालुक्यात आढळले. अस्वच्छता आणि प्रदुषित पाणी असणाऱ्या जिल्हाभरातील २३५ गावांना पाणी व स्वच्छता विभागाकडून पिवळे कार्ड देण्यात आले.
ज्या गावांमध्ये अस्वच्छता आढळून येते त्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे केले जाते. वर्षातून दोन वेळा पाण्याचे सर्वेक्षण केले जाते. एप्रिल व आॅक्टोबर या दोन महिन्यांत सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे लाल, हिरवा, पिवळे किंवा चंदेरी रंगाचे कार्ड दिले जाते.
जिल्ह्यातील अस्वच्छता असलेल्या २३५ गावांना पिवळ्या रंगाचे कार्ड देण्यात आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यातील ६३, गोरेगाव ३५, आमगांव १५, तिरोडा ९०, सालेकसा १४, देवरी १५, सडक अर्जुनी ३ अशा गावांचा समावेश आहे. हिरवे कार्ड, अर्थात चांगली स्थिती असणाऱ्या ग्रामपंचायतीत गोंदिया तालुक्यातील ४५, गोरेगाव २०, आमगाव ४९, तिरोडा ५, सालेकसा २९, देवरी ४१, सडक-अर्जुनी ६० तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वात जास्त ७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
नागरिकांना शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाने पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत स्त्रोतनिहाय स्वच्छता सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता सर्वेक्षणातून पाण्याच्या स्त्रोताजवळील परिसर, पाणी पुरवठा सरंचना व व्यवस्थापनातील जे दोष आढळून येतील त्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ज्या ग्रामपंचायतींमध्ये पाणी शुध्दीकरण अनियमित होते, पाणी स्त्रोताचा परिसर अस्वच्छ आहे, नळ गळत्या व व्हॉल्व गळत्या आहेत अशा ग्रामपंचायतींनी टीसीएल पावडरचा साठा पुरेशा उपलब्ध ठेवला नसेल, वर्षभरात जलजन्य साथ रोगांचा उद्रेक झालेला असेल, अशा ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात येते. परंतु गोंदिया जिल्ह्यात लाल कार्ड घेणारी एकही ग्रामपंचायत नाही. सदर दोष ज्या ग्रामपंचायतीमध्ये आढळून येत नाही अशा ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड दिले जाते.
हिरवे कार्ड घेणाऱ्या जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायती आहेत. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अस्वच्छता असते अशा ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. ज्या ग्रामपंचायतीत सलग ५ वर्षे साथीचा उद्रेक झालेला नाही, पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेले आहे अशा ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड देण्यात येते. परंतु गोंदिया जिल्ह्यात चंदेरी कार्ड घेणारी एकही ग्रामपंचायत नाही. (तालुका प्रतिनिधी)
३०५ पैकी ६५
पाणी नमुने दूषित
जिल्हा प्रयोग शाळेने यंदा ग्रामीण भागातील १७२ पाण्याचे नमुने तपासले. त्यात २० नमुने दूषित तर शहरी भागातील १५९ नमुने तपासले असून ४५ नमुने दूषित आढळले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील ३०५ पैकी ६५ नमुने दूषित आढळले आहेत.