गोंदिया : काम करून देण्याच्या मोबदल्यात खर्चा-पाणी, तसेच मिठाईच्या नावावर पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार आज सर्वच कार्यालयांत सर्रास सुरू आहे. यात शासकीयच काय, खासगी कार्यालयांचाही समावेश आहे. पैशांची अशी मागणी करणाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून दणका दिला जात आहे. अशात लाचखोरीचे हे प्रमाण जिल्हा परिषद-पंचायत समिती ग्रामविकास विभागात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सन २०१६ पासूनच्या आकडेवारीनुसार, जिल्हा परिषद-पंचायत समिती ग्रामविकास विभागात २५ कारवाया करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, येथेच सर्वाधिक लाचखोरी होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आजच्या काळात नातेसंबंधांपेक्षा माणसाला पैसा जास्त मोठा झाला आहे. हेच कारण आहे की, काम करून देण्याची आपली जबाबदारी आहे हे समजून न घेता, माणूस प्रत्येकच कामासाठी समोरील व्यक्तीकडून काही ना काही अपेक्षा बाळगून असतो. यात सर्वाधिक प्रकार पैशांच्या देवाण-घेवाणीचे चालतात. शासकीय काय तर खासगी कार्यालयांतही आता खुलेआम पैशांची मागणी केली जाते. मजबुरी असल्याने काम करवून घेण्यासाठी आज प्रत्येकच व्यक्ती पैसा मोजून देतो. पैसा घेऊन काम करून देणे ही समाजात एक परंपराच बनली आहे आणि येथूनच आजघडीला खर्चापाणी किंवा मिठाईच्या नावावर लाचखोरी फोफावत चालली आहे.
खर्चापाणीच्या नावावर सुरू असलेल्या या लाचखोरीवर आळा घालण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असून, अशा लाचखोरांना ते दणका देत आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येकच व्यक्ती लाच मागणाऱ्याच्या विरोधात तक्रार देत नसल्याने समाजातून लाचखोरी अद्याप संपुष्टात आली नाही. मात्र, हा प्रकार खपवून न घेणाऱ्या व्यक्तींमुळे काही लाचखोर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हातीही लागतात. अशाच लाचखोरांची पाहणी केल्यास, जिल्हा परिषद-पंचायत समिती ग्रामविकास विभागात लाचखोरीचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे दिसून आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सन २०१६ ते २०२० पर्यंतच्या अहवालातून हा प्रकार उघडकीस आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ग्रामविकास विभागात सन २०१६ पासून २०२० पर्यंत २५ कारवाया करण्यात आल्या असून, २९ आरोपींना दणका देण्यात आला आहे. यामध्ये सन २०१६ मध्ये ४ कारावायांत ५ आरोपी, सन २०१७ मध्ये ४ कारवायांत ५ आरोपी, सन २०१८ मध्ये ८ कारवायांत ९ आरोपी, सन २०१९ मध्ये ४ कारवायांत ५ आरोपी, तर सन २०२० मध्ये ५ कारवायांत ५ आरोपींना दणका देण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग असून, येथे १७ कारवायांत १९ आरोपी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहेत.
-----------------------------
जलसंपदा विभागात फक्त १ कारवाई
ग्रामविकास व महसूल विभागात जेथे लाचखोरी बोकाळलेली दिसत आहे, तेथेच जलसंपदा विभागात सर्वात कमी फक्त १ कारवाई करण्यात आली आहे. एकंदर लाचखोरीच्या प्रकारात जलसंपदा विभाग तेवढ्याने ठीक दिसून येत आहे. मात्र, १ कारवाई झाल्यानंतर जलसंपदा विभागही धुतलेले नाही, हे दिसून येते. विशेष म्हणजे, सर्वच विभागांत लाचखोरीची कीड लागलेली आहे. यात कोठे ती उघडकीस येते, तर कोठे ती असूनही आतल्या आत पोखरत चालली आहे.
---------------------------
नववर्षातही खाते उघडले
सन २०२१ मध्ये देशात कोरोना लस आली व सर्वांसाठीच नववर्ष सुखद लाभले आहे. अशात लाच लुचपत प्रतिबंधक विभागासाठीही नववर्ष भरभराटीचे लागले आहे. कारण विभागाने नववर्षात आतापर्यंत ३ कारवाया करून खाते उघडले आहे. यामध्ये पहिली कारवाई पोलीस खात्यातील, दुसरी कारवाई बाल विकास प्रकल्प कार्यालयातील, तर तिसरी कारवाई सीमा तपासणी नाका येथे करण्यात आली आहे.