७२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
By Admin | Updated: October 15, 2014 23:19 IST2014-10-15T23:19:03+5:302014-10-15T23:19:03+5:30
गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान पार पडले. चारही मतदार संघातील एकूण ५४ उमेदवारांचे भवितव्य या मतदानाने यंत्रबद्ध झाले.

७२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
प्रचंड उत्सुकता : ५४ उमेदवारांचे भाग्य यंत्रबध्द, तीन गावातील नागरिकांचा मात्र बहिष्कार
गोंदिया : गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान पार पडले. चारही मतदार संघातील एकूण ५४ उमेदवारांचे भवितव्य या मतदानाने यंत्रबद्ध झाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपेक्षाही यावेळी मतदानाचे प्रमाण वाढले आहे. सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आमगाव या नक्षलप्रभावित मतदार संघात मतदानासाठी दुपारी ३ पर्यंतची मर्यादा होती. असे असतानाही तिथे ७० टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे. यादरम्यान कुठेही कोणती अनुचित घटना घडलेली नाही. मात्र गोंदिया शहरात फुलचूर येथील मतदान केंद्र क्रमांक २९९ वर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये थोडी हाणामारी झाली. यात एकजण जखमी झाला. मतदारांना पैसे वाटण्यास मज्जाव केल्याने एका युवकाला मारहाण झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या मतदार संघातील तीन गावांतील नागरिकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला.
सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. ८ वाजतानंतर मतदान जोरात सुरू झाले. सकाळी ११ वाजतानंतर महिला उमेदवारांची संख्या वाढली होती. दुपारीनंतर ही गर्दी वाढली. सायंकाळी ६ वाजता रांगेत असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी पात्र ठरविले. त्यामुळे अनेक ठिकाणी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते.गोंदिया शहराच्या गोविंदपूर, छोटा गोंदिया, फुलचूर आणि सिव्हील लाईन या भागात सायंकाळी मतदानासाठी गर्दी वाढली होती. गोविंदपूर येथील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे निवडणूक निरीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
मतदार उत्साहात, यंत्रणा टेन्शनमध्ये
गोंदिया शहरासह ग्रामीण भागात मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आला. त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ७३.१२ टक्के मतदानापेक्षा यावेळी टक्केवारी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गोंदिया शहरात सर्वाधिक उत्साह आणि मतदारांची गर्दी गोविंदपूर भागातील मतदान केंद्रांवर होती. मनोहर म्युनिसिपल हायस्कूल या केंद्रावर सकाळपासून मदारांच्या रांगा लागल्या होत्या. यात महिलांची गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवला.
मतदारांमध्ये असलेली चुरस पाहता गोंदियातील उमेदवार गोपालदास अग्रवाल, विनोद अग्रवाल, अशोक गुप्ता यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
गोंदिया विधानसभा मतदार संघातील संवेदनशील २१ आणि आमगाव विधानसभा मतदार संघातील उपद्रवी असलेल्या २१ मतदान केंद्रावर इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्सचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते.
काही मतदान केंद्राबाहेर मतदारांना गुपचूप पैसे वाटप करण्याचे प्रकार घडले. गोंदियातील एका केंद्रावर अशा पद्धतीने पैसे वाटप करणाऱ्याकडून १० हजार रुपये जप्त करण्यात आले. मात्र पोलिसांत त्याबाबतची नोंद नव्हती. सोबतच मतदारांना राजकीय पक्षांकडून चिठ्ठ्या दिल्या जात होत्या.