इटखेडा येथे माकडांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:12 IST2018-03-18T22:11:38+5:302018-03-18T22:12:35+5:30
तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथे सध्या माकडांचा हैदोस सुरू असून कौलारू घरांचे अतोनात नुकसान होत आहे.

इटखेडा येथे माकडांचा हैदोस
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथे सध्या माकडांचा हैदोस सुरू असून कौलारू घरांचे अतोनात नुकसान होत आहे. या माकडांना पिटाळून लावण्यास गेले असता ते उलट आक्रमण करीत आहेत. याबाबत अर्जुनी-मोरगाव वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ईटखेड्याचे माजी सरपंच उद्धव मेहेंदळे यांनी केली आहे.
इटखेडा येथे मागील दोन वर्षांपासून माकडांनी गावात उच्छाद मांडला आहे. वानरांचे कळप घरांवर उड्या मारत असल्याने घरावरील कवेलू फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. महागडे कवेलु खरेदी करून लाकूड फाट्यांनी छताची नेहमी दुरुस्ती करणे गरीबांच्या जीवावर आले आहे. एवढेच नव्हे तर घरातील अन्न पदार्थ सुद्धा माकडे पळवून नेतात. परसबागेतील वांगी, टमाटर व इतर भाजीपाल्याची नासधुस करतात.
महिला व लहान मुलेच नव्हे तर पुरुषांवर सुद्धा माकड आक्रमण करतात. प्रसंगी चावाही घेत असल्याने ईटखेडावासी भयभीत झाले असून लगतच्या ग्राम ईसापूर येथील गावकरीही त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी घरावर ताडपत्र्या मांडल्यात, परंतु काही ठिकाणी छत पडले आहेत.
वन्यप्राण्यांनी यापूर्वी केलेल्या हल्ल्यात जीवसुद्धा गमवावा लागला आहे. आताही अस्वलाचे दर्शन नेहमीच गावकऱ्यांना घडत आहे. वन्यप्राण्यांच्या भितीने आता ईटखेडावासी ग्रासले आहे.
वनपरिक्षेत्रअधिकारी तसेच जिल्हा वनअधिकारी यांनी ईटखेडा-ईसापूर गावातील माकडांच्या टोळ्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे व गावातून माकडांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मेहेंदळे यांनी दिला आहे.