महावितरण पॉवर हाऊसचे आधुनिकीकरण करा
By Admin | Updated: May 16, 2016 02:04 IST2016-05-16T02:04:25+5:302016-05-16T02:04:25+5:30
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात वसलेली नगरपंचायत म्हणजे देवरी. परंतु नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना शासनाकडून नक्षलग्रस्त निधी ...

महावितरण पॉवर हाऊसचे आधुनिकीकरण करा
उपकरणे झाली जीर्ण : पावसाळा सुरू होण्याआधीच वीज खंडितचा त्रास
देवरी : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात वसलेली नगरपंचायत म्हणजे देवरी. परंतु नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना शासनाकडून नक्षलग्रस्त निधी अंतर्गत विशेष अर्थसहाय्य विविध योजनांच्या माध्यमातून करुन सोयीसुविधा पोहोचविण्याचे कार्य शासन करते. परंतु देवरी नगर पंचायत क्षेत्रात सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे कुठलेही मोठे कारण नसताना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास. महावितरणचे पॉवर हाऊस आधुनिक केल्याशिवाय या त्रासातून देवरीवासीयांची मुक्तता होणार नाही.
हा त्रास नागरिकांना सतत दोन तीन वर्षापासून सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कितीतरी वर्षांपासून जी उपकरण लावली आहेत ती जीर्ण होत असल्याने त्याच्या व्यवस्थापनात वारंवार अडचण निर्माण होत आहेत, असे महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या नागरिकांच्या प्रमुख अडचणींकडे कुणाचे लक्ष नसताना सतत समाजाच्या छोट्या व प्रमुख अडचणींकडे ज्यांचे प्रामुख्याने लक्ष असले असे देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते व नगर पंचायत सदस्य यादोराव पंचमवार व भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार यांनी जनतेची ही समस्या आ. संजय पुराम यांच्याकडे मांडली.
आ. पुराम यांनी जनतेची ही समस्या समजून त्वरित राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देवरी पॉवर हाऊसचे आधुनिकीकरण करण्यात यावे, येथील विद्युत पुरवठा ३३ केव्ही वॅटवरून ६६ केव्ही वॅट करावा, येथे असलेली ५ एम.व्ही.ए. एक्सएमईआर हे ट्रान्सफार्मर १० एम.व्ही.ए. एक्सएमईआर करण्यात यावी व संपूर्णत: आधुनिकीकरण करुन व्यवस्थित विद्युत पुरवठा कसा होईल यासंबंधी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे, असे निवेदन ऊर्जामंत्र्यांच्या दालनात सादर केले.
परंतु अजूनपर्यंत संबंधित कार्यालयाला तशा सूचना प्राप्त झाल्या नाहीत. ऊर्जा खात्याच्या बाबतीत सदैव तत्पर असलेले ऊर्जामंत्री देवरी पॉवर हाऊसचे आधुनिकीकरण केव्हा करतात व पावसाळा सुरू होण्याआधी नकळत वारंवार विद्युत खंडित होण्यामुळे होणारा देवरी नगरवासीयांचा त्रास केव्हा दूर करतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जर या पॉवरहाऊसचे आधुनिकीकरण झाले नाही दिवसेंदिवस जीर्ण होत असलेली ही उपकरणे जळून भस्म होतील व देवरी पॉवरहाऊस म्हणून जेवढ्या क्षेत्रात विद्युत पुरवठा होतो तेवढ्या क्षेत्रातील जनतेला अंधारात रहावे लागेल. (प्रतिनिधी)