वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:17+5:302021-01-24T04:13:17+5:30
गोंदिया : शहरासह जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी बोकाळली आहे. या गुन्हेगारीच्या जोरावर काही गावगुंडांनी स्वत:चे वर्चस्व निर्माण केले आहे. या ...

वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी मोक्का
गोंदिया : शहरासह जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी बोकाळली आहे. या गुन्हेगारीच्या जोरावर काही गावगुंडांनी स्वत:चे वर्चस्व निर्माण केले आहे. या दमनचक्राला पोलिसांनी वेळीच उद्ध्वस्त केले नाही तर शांतताप्रिय जिल्ह्याला घरघर लागल्याशिवाय राहणार नाही. मागील दोन वर्षांत वर्चस्ववादातून आणि संघटित गुन्हेगारीसह परस्पर वैमनस्यातून तब्बल ७० जणांना ठार करण्यात आले, तर ३२ जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यात रेतीमाफियांमुळे मोठ्या प्रमाणात गँगवाॅर होत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने या अट्टल गुन्हेगारांवर मोक्का लावून त्यांना तुरुंगातच ठेवण्याची तयारी दर्शविली आहे.
मागील दोन वर्षांत दोन संघटित गुन्हेगारी टोळक्यांतील अनेक गुंडांवर मोक्कांतर्गत तसेच एमपीडीअंतर्गत कारवाई करून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या नादात खून करणे, हा त्यांच्यासाठी सोपा मार्ग होऊन बसला आहे. गावठी दारू, गांजा, जुगार ते विदेशी नशेचा बाजार मांडून अनेकजण गडगंज झाले आहेत. महात्मा गांधी यांचा शांतीप्रिय जिल्हा असा लौकिक असलेल्या गोंदिया जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ११ जानेवारी रोजी पहिल्यांदाच मुंबई पोलीस कायदा कलम ५५चा वापर करीत १८ गुन्हेगारांना हद्दपार केले. सन २०१९मध्ये ३७ खून, तर १८ खुनाचे प्रयत्न झाले होते. सन २०२०मध्ये ३३ खून व १४ खुनाचे प्रयत्न झाले आहेत. गोंदियात होणाऱ्या बहुतांश खुनांत देशी कट्ट्याचा वापर होतो. हे कट्टे येतात कोठून, याच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान गोंदिया पोलिसांपुढे आहे.