‘मिशन इंद्रधनुष’ माघारले

By Admin | Updated: February 6, 2016 01:46 IST2016-02-06T01:46:08+5:302016-02-06T01:46:08+5:30

बालक व माता मृत्यूला आळा बसावा यासाठी राज्यात मिशन इंद्रधनुष सुरू करण्यात आले. मात्र गोंदिया जिल्ह्यात हे मिशन अपेक्षित परिणाम साधू शकले नाही.

'Mission Rainbow' Magharlee | ‘मिशन इंद्रधनुष’ माघारले

‘मिशन इंद्रधनुष’ माघारले

लसीकरणात उदासीनता : ५७.४८ टक्के गर्भवतींचे लसीकरण
नरेश रहिले गोंदिया
बालक व माता मृत्यूला आळा बसावा यासाठी राज्यात मिशन इंद्रधनुष सुरू करण्यात आले. मात्र गोंदिया जिल्ह्यात हे मिशन अपेक्षित परिणाम साधू शकले नाही. मिशनअंतर्गत टिटॅनस, हिपेटायटिस, गोवर याचे लसीकरण ५७ ते ७२ टक्के झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रसुती व बालआरोग्य अभियानांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१५-१६ या वर्षात जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत प्रसूतीपूर्वी २५ हजार ५८० महिलांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. परंतु १६ हजार ८७५, म्हणजेच ६५.९७ टक्के नोंदणी झालेली आहे. प्रसूतीपूर्वी नोंदणीचे १२ आठवड्याचे उद्दीष्ट २३ हजार २२ ठेवण्यात आले होते. मात्र ही नोंदणी १४ हजार २७५, म्हणजेच ६२.०१ टक्के झाली आहे. २५ हजार ५८० गर्भवती महिलांचा टिटॅनसची लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. परंतु १४ हजार ७०४ महिलांना ही लस देऊन झाली असून ५७.४८ टक्के उद्दीष्ट गाठले आहे.

चार टप्यात होते मिशन इंद्रधनुष
जिल्ह्यात मिशन इंद्रधनुषअंतर्गत ७ ते १३ आॅक्टोबर हा पहिला टप्पा, १६ ते २२ नोव्हेंबरदरम्यान दुसरा टप्पा, १६ ते २२ डिसेंबर तृतीय टप्पा, तर २५ ते ३१ जानेवारीदरम्यान चौथा टप्पा अश्या चार टप्प्यात लस देण्यात आली. या मिशनअंतर्गत टीटी-१, टीटी-२, ओपीवी (इनएक्टीवेटेड पोलियो वॅक्सिन), हिपेटायटिस १, २, ३, गोवर १, २ व विटामिन ए १, २ चा डोज बालक व गर्भवती महिलांना द्यायचे होते. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जाऊन नोंदणी करून १०० टक्के लस द्यायची होती. पण हे उद्दीष्ट गाठणे शक्य झाले नाही.या मिशनमध्ये जिल्ह्यातील आशा कार्यकर्ता, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. एकही बालक व गर्भवती माता लसपासून वंचित राहू नये असे निर्देश शासनाने दिले होते.

- हिपेटायटीसचे उद्दिष्टही अपूर्ण
जिल्ह्यात २३ हजार २५५ बालकांना हिपेटायटीस ३, बी.सी.जी., पोलियो डोज, गोवर, गोवर बुस्टरच्या लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यात १४ हजार ३८२ बालकांना (६१.८४ टक्के) हिपेटायटीस ३, तर १४ हजार ४१२ (६१.९७ टक्के) बालकांना पोलिओचा तिसरा डोज देण्यात आला. १४ हजार ७१७ (६३.२९ टक्के) बालकांना बी.सी.जी., १५ हजार १३५ (६५.०८ टक्के) बालकांना गोवर व १४ हजार २६३ (६१.३३ टक्के) बालकांना गोवर बुस्टरची लस देण्यात आली.
पोलियोचा कोणताही डोज ६३ टक्केपेक्षा अधिक बालकांना देण्यात आलेला नाही. जीवनसत्वाच्या सर्व मात्रा ७५.८९ ते ९१.३४ टक्केदरम्यान देण्यात आल्या. टिटॅनसची लस १० वर्षाखालील २४ हजार ६१३ बालकांना देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यातील १७ हजार २६८ बालकांना ही लस देण्यात आली असून ७०.१६ टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले होते. टिटॅनस लस १६ वर्षाखालील २५ हजार ४३७ बालकांना द्यायची होती. त्यातील १८ हजार ३५८ म्हणजे ७२.१७ टक्के बालकांना ही लस देण्यात आली आहे.

Web Title: 'Mission Rainbow' Magharlee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.