मेडिकल कॉलेजसंदर्भात मंत्र्यांनी घेतला आढावा
By Admin | Updated: December 15, 2014 22:59 IST2014-12-15T22:59:30+5:302014-12-15T22:59:30+5:30
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केलेल्या

मेडिकल कॉलेजसंदर्भात मंत्र्यांनी घेतला आढावा
दिशानिर्देश : अग्रवाल यांनी विशेष बैठकीत मांडली बाजू
गोंदिया : गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर नागपूरच्या रविभवनातील कॉटेजमध्ये विशेष बैठक घेण्यात आली. यात गोंदिया व चंद्रपूरच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजसंदर्भात चर्चा करून मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिशानिर्देश दिले.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण सचिव म्हैसकर यांनी सांगितले की, गोंदियात मेडीकल कॉलेज दोन वर्षांपूर्वी सन २०१२ मध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी शक्य तेवढे प्रयत्नसुद्धा करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन व मागील आघाडी सरकारद्वारे गोंदियाच्या कुडवा गावात १५ हेक्टर जमीन वन कायद्यातून मुक्त करवून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातच केंद्र सरकारने १४२ कोटींचा निधी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी राज्य सरकारला दिले आहेत.
मागील वर्षी राज्य शासनाने आवश्यक जमीन उपलब्ध करविण्याच्या आधीच शासकीय मेडीकल कॉलेजच्या मंजुरीचा अग्रीम प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला (एमआयसी) पाठविला होता. यात राज्य शासनाने आवश्यक जमीन वन कायद्यातून मुक्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करविण्याचे हमीपत्र दिले होते. परंतु राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने सदर हमीपत्राला न जुमानत, आधी जमीन उपलब्ध करा व नंतर पुन्हा प्रस्ताव पाठवा, असे निर्देश देत गोंदिया शासकीय मेडीकल कॉलेजचे प्रस्ताव नामंजूर करून परत पाठविले होते. आता आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया शासकीय मेडीकल कॉलेजसाठी १५ हेक्टर जमीन कुडवा गावात वन कायद्यातून मुक्त करून मंजूर करून दिली आहे. सदर जमीन उपलब्ध झाल्यानंतर आत राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांद्वारे पुन्हा गोंदिया शासकीय मेडीकल कॉलेजचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रस्तावात सर्व आवश्यक जमीन उपलब्धतेचे प्रमाणपत्र राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेद्वारे जाहीर प्रारूपात पाठविण्यात आले आहेत.
बैठकीत आ.अग्रवाल म्हणाले की, मागील सरकारने राज्यात सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी चार मेडीकल कॉलेजांसाठी आतापर्यंत जमीन उपलब्ध झालेली नाही. केवळ गोंदिया, बारामती व चंद्रपूर येथेच जमीन उपलब्ध झालेली आहे. परंतु इतर तांत्रिक कारणांमुळे बारामती व चंद्रपूर येथेसुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे शक्य नाही. तेव्हा राज्यात यावर्षी प्रयत्न केल्यावर केवळ गोंदियातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे शक्य आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती व डिन पदावर डॉ. ए.एन. केवलिया यांची नियुक्ती मागील सरकारद्वारे २३ जून २०१४ रोजी करण्यात आली आहे. आता राज्य शासनाला गोंदियात शासकीय मेडीकल कॉलेज सुरू करण्यात कसलीही अडचण राहिली नाही. सर्व परिस्थितींच्या विस्तृत माहितीनंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावाडे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदियात शासकीय मेडीकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करविण्याची बाब बैठकीत सांगितली. त्यातच वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. शिंगारे यांनी सांगितले की, याच आठवड्यात राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची निरीक्षण चमू गोंदियात शासकीय मेडीकल कॉलेजच्या अंतिम मंजुरीसाठी दौरा करणार आहे. त्यानंतर शासकीय मेडीकल कॉलेजला अंतिम मंजुरी प्राप्त होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)