केशोरी : १८ जानेवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान पाळण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे यांच्या पथकाने येथील गाव प्रवेशद्वारावर नियमित अभियान राबवून वाहतुकीच्या नियमाचा संदेश पोहाेचविण्याचा एक अभिनव उपक्रम पथनाट्यातून राबविला आहे.
कोरोना संकटावर मात करुन शासनाच्या निर्देशानुसार या परिसरातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाले आहेत. शाळेत येताना विद्यार्थी दुचाकी वाहनांचा वापर करतात. त्यांच्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना सुद्धा नसतो. त्यांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव राहत नाही. वाहन वेगाने चालविण्याशिवाय त्यांना काहीच समजत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. मुख्यत्त्वाने हेच दृष्टी समोर ठेवून सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधत वाहतुकीचे नियम अवगत व्हावे, विना परवाना दुचाकी गाडी चालवू नये, वाहतुकीच्या चिन्हांचे पालन व्हावे, दुचाकी वाहनावर २ पेक्षा अधिक व्यक्ती बसवू नये, बेशिस्तपणे वाहन चालवू नये, हेल्मेटचा वापर करावा या सर्व नियमांची वाहन चालकांना जाणीव व्हावी म्हणून येथील ठाणेदार इंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या पथकाने येथे रस्ता सुरक्षा अभियान राबविले. या अंतर्गत, पथनाट्यातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश पोहाेचविण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे.