कुंचल्यातून दिला ‘बेटी बचाओ’चा संदेश
By Admin | Updated: September 30, 2016 02:01 IST2016-09-30T02:01:07+5:302016-09-30T02:01:07+5:30
एखाद्या कलेच्या माध्यमाने जगासमोर आपली ओळख निर्माण करू इच्छिणारे विद्यार्थी कुंचल्याचा आधार घेत चित्र साकारतात.

कुंचल्यातून दिला ‘बेटी बचाओ’चा संदेश
४०० विद्यार्थी सहभागी : चित्रकला स्पर्धेला जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी
गोंदिया : एखाद्या कलेच्या माध्यमाने जगासमोर आपली ओळख निर्माण करू इच्छिणारे विद्यार्थी कुंचल्याचा आधार घेत चित्र साकारतात. याच कलेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश समोर ठेवून लोकमत बालविकास मंच व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलच्या प्रांगणात आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध समस्यांवर कुंचल्यातून आपले चित्ररूपी विचार साकारले.
विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून त्यांचे मत मांडता येईल याकरिता पर्यावरण, प्रदूषण, बेटी बचाव, स्वच्छ भारत यासारख्या महत्वाच्या विषयांवर विविध शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवून चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद दिला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, देवरीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य रितेश मेहता, व्यवस्थापक योगेश मात्रे, जंबो किड्सच्या मुख्याध्यापिका सुमन खंडेलवाल, श्रीकांत ठाकूर, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, जाहिरात विभाग प्रमुख अतुल कडू, इव्हेंट संयोजक श्रीकांत पिल्लेवार उपस्थित होते. सुरूवातीला देवी सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी चायनिज पितृमोक्ष अमावशेवर एक लघुनाटिका सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ४०० विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चित्र साकारले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला शिक्षक अरूण नशीने व कुंदन शेंडे उपस्थित होते. त्यांनी चित्रांचे निरीक्षण व परीक्षण केले. कार्यक्रमासाठी शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)