पारा चाळीशीच्या पार

By Admin | Updated: April 2, 2017 01:02 IST2017-04-02T01:02:12+5:302017-04-02T01:02:12+5:30

एप्रिल-मे महिन्यातील तापमान मार्च महिन्यातच अनुभवायला आल्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत.

The mercury crosses forty | पारा चाळीशीच्या पार

पारा चाळीशीच्या पार

रस्त्यांवर शुकशुकाट : काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
गोंदिया : एप्रिल-मे महिन्यातील तापमान मार्च महिन्यातच अनुभवायला आल्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्हा यात होरपळून निघत आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यापासून उन्हाळा खऱ्या अर्थाने रंगात येतो असा आजवरचा अनुभव आहे. तर मे महिन्यात उन्हाळा रंगात येतो असे आतापर्यंत बघावयास मिळाले आहे. त्यामुळे नागरिक मे महिन्यात दुपारच्या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळत असून तेव्हाच रस्ते शुकशुकाट दिसतात. यंदा मात्र वातावरण चांगलेच बदलले असून आता जेमतेम मार्च महिनाच सुरू असताना रविराज डोळे वटारून आपला रंग दाखवू लागले आहेत. यामुळेच आतापासूनच ४० डिग्रीच्यावर तापमानाची नोंद घेतली जात आहे. या उष्णलहरीमुळे शहरातील रस्ते आतापासूनच ओस पडत आहेत. मार्च महिनाही संपलेला नसताना उन्हाचा उद्रेक बघता येणाऱ्या एप्रिल, मे व जून महिन्यात काय कहर होणार याचा विचार करूनच अंगाला घाम फुटत आहे. यंदाच्या उन्हाने नागरिकांच्या अंगाची आतापासूनच लाही-लाही होत आहे. एवढेच नव्हे तर पंखे व कुलर आतापासूनच फेल ठरत आहेत. उन्हात निघणे टाळले जात असल्याची जाणीव रस्त्यांवरील शुकशुकाट करून देत आहे. (शहर प्रतिनिधी)

तापमानमापकाची व्यवस्थाच नाही
काही वर्षांपूर्वी येथील जुन्या तहसील कार्यालयात तापमान मापक यंत्र होते व तहसील कार्यालयातील संबंधीत कर्मचाऱ्यांकडून तापमानाची नोंद दररोज मिळत होती. शिवाय तहसील कार्यालयात एक चार्ट लावले जात होते व त्यावर दररोजची नोंद केली जात होती. अशात कुणालाही तेथून तापमान कळत होते. आता मात्र मागील काही वर्षांपासून ही व्यवस्था फिस्कटली आहे. शिवाय सध्या तरी तहसील कार्यालयाकडे तशी काहीच व्यवस्था नसल्याचेही कळले. त्यामुळे आजघडीला फक्त बिरसी विमानतळ येथेच तापमान मापक यंत्र असल्याची माहिती आहे.
 

Web Title: The mercury crosses forty