पं.स.सदस्यांनी स्वत:ला कोंडून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:13+5:30

प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रभार काढण्याचा ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठविला. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी दखल घेत नाही. माहुरकुडा, सिरोली येथील ग्रामसेविकेची बदली येगाव, जानवा येथे तर येगाव, जानवा येथील ग्रामसेविकेची बदली माहुरकुडा, सिरोली येथे २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. मात्र अद्याप बदलीच्या ठिकाणी ते रुजू झाले नाहीत. ग्रामसेवकांकडून चौदाव्या वित्त आयोगाची नीट अंमलबजावणी केली जात नाही.

Members of the Panchayat Samiti surrounded themselves | पं.स.सदस्यांनी स्वत:ला कोंडून घेतले

पं.स.सदस्यांनी स्वत:ला कोंडून घेतले

ठळक मुद्देअनोखे आंदोलन : मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : २७ डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या सभेतून सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर ३ जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी सभापती अरविंद शिवणकर यांच्यासह १३ सदस्यांनी स्वत:ला पं.स.सभागृहात कोंडून घेतले. मागण्या पूर्ण होईस्तोवर सभागृहातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पं.स.इतिहासात असे आंदोलन करण्याचा हा पहिलाच अनोखा प्रसंग आहे.
स्थानिक पंचायत समितीची मासिक सभा २७ डिसेंबर रोजी होती.पं.स. च्या सभेत घेतलेल्या ठरावांची अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अंमलबजावणी होत नाही. अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीत सावळागोंधळ झाला आहे. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रभार काढण्याचा ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठविला. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी दखल घेत नाही. माहुरकुडा, सिरोली येथील ग्रामसेविकेची बदली येगाव, जानवा येथे तर येगाव, जानवा येथील ग्रामसेविकेची बदली माहुरकुडा, सिरोली येथे २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. मात्र अद्याप बदलीच्या ठिकाणी ते रुजू झाले नाहीत. ग्रामसेवकांकडून चौदाव्या वित्त आयोगाची नीट अंमलबजावणी केली जात नाही. सार्वत्रिक बदलीचे वेळी झाशीनगर येथील ग्रामसेवकाची कुंभीटोला, बोदरा येथे बदली झाली होती. बदलीचे ठिकाणी रुजू झाले मात्र त्यांनी झाशीनगर ग्रामपंचायत सोडली नाही. अशा ग्रामसेवकावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही असा आरोप शिवणकर यांनी केला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी २०१४ चे शासन परिपत्रकात मानधनी निवृत्तीचे वय ६५ वर्षे नमूद आहे. तर २०१८ च्या परिपत्रकात ६० वर्षे आहे. नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रि येत काही नियुक्त महिलांना ६० तर काहींना ६५ असे दोन्ही प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रक्रि येत नियमबाह्य कामे करण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. याविषयी आ.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या आढावा बैठकीत मुद्दा रेटण्यात आला होता. याच विषयांवर २७ डिसेंबरच्या सभेतून सर्वपक्षीय १४ सदस्यांनी सभात्याग करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. ३ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या वेळी आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट केले नव्हते. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने या गंभीर बाबींची दखल घेतली नाही. शुक्रवारी सकाळी सर्व सदस्य एकत्र आले. सभापती अरविंद शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या वेळी स्वत:ला कोंडून घेण्याचा आंदोलन करण्याचे ठरले. सदस्यांशी पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर दुपारी २ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात सदस्यांनी स्वत:ला कोंडून घेतले. मागण्या पूर्ण होईस्तोवर सभागृहातच राहणार असल्याचे शिवणकर यांनी सांगितले. दुपारी ४ वाजता गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी सदस्यांशी चर्चा केली, मात्र तोडगा निघाला नव्हता.

तांत्रिक अडचणी- आंदेलवाड
सदस्यांच्या मागण्यांपैकी काही मागण्या वरिष्ठ स्तरावरच्या आहेत. तर काही मागण्यांमध्ये तांत्रिक अडचणी आहेत. वरिष्ठ स्तरावरच्या मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषदेला कळविण्यात आले आहे.सदस्यांचा सन्मान राखूनच कामे केली जात आहेत.सदस्यांनी सहकार्य करावे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी केले आहे.
कोंडून घेतलेल्या सदस्यात यांचा समावेश
सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती करुणा नांदगावे, आशा झिलपे, अर्चना राऊत, रामलाल मुंगणकर, सुधीर साधवानी, जनार्धन कालसरपे, संघदिप भैसारे,प्रेमलाल गेडाम, शिशूला हलमारे, जयश्री पंधरे, पिंगला ब्राम्हणकर, नाजूका कुंभरे, होमराज कोरेटी या सदस्यांचा समावेश आहे.

हा सभागृहाचा अवमान- शिवणकर
आम्ही लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी खुर्चीवर बसलो आहोत. प्रशासन ऐकत नाही. सभेत घेण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नाही. हा एकप्रकारे सभागृहाचा अवमान आहे. जे अधिकारी कामे करतात त्यांची एकाएकी बदली होते.ज्यांच्या तक्रारींचे ठराव घेतले जातात त्यांचेवर कारवाई होत नाही. अर्जुनी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे वर्षभरापासून भिजत घोंगडे सुरू आहे. अद्याप टेंडर प्रक्रिया झाली नाही निधी पडून आहे. अशा अनेक बाबींसाठी हे आंदोलन आहे अशी माहिती सभापती अरविंद शिवणकर यांनी दिली.

Web Title: Members of the Panchayat Samiti surrounded themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.