ग्रामीण भागात चढला मंडईचा ज्वर

By Admin | Updated: November 16, 2015 01:45 IST2015-11-16T01:45:16+5:302015-11-16T01:45:16+5:30

ग्रामीण भागात दिवाळी केवळ दोन दिवस साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळी संपताच लगेच तिसऱ्या दिवसापासून मंडईचा ज्वर ग्रामीण भागात चढतो.

Melting fever rises in rural areas | ग्रामीण भागात चढला मंडईचा ज्वर

ग्रामीण भागात चढला मंडईचा ज्वर

वर-वधू शोधमोहीम : नाटकांसह गोंधळ व तमाशांची मेजवानी, पाहुण्यांची रेलचेल
गोंदिया : ग्रामीण भागात दिवाळी केवळ दोन दिवस साजरी केली जाते. त्यामुळे दिवाळी संपताच लगेच तिसऱ्या दिवसापासून मंडईचा ज्वर ग्रामीण भागात चढतो. सध्या जिल्हाभरातील अनेक गावांत मंडईचा ज्वर चढला असून पाहुण्यांची ये-जा सुरू आहे.
सध्या रेल्वे स्थानक व एसटीच्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पाहुण्यांची वर्दळ व लोकांची गर्दी यामुळे रेल्वे व बस स्थानक फुलले आहे. ही गर्दी बघून काही व्यक्ती आपल्या स्वत:च्या मोटारसायकलचा उपयोग करीत आहेत. सध्या शाळांना तसेच अनेक कार्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे पार्टी मामाच्या गावाला जाण्याची इच्छा आपल्या आई-वडिलांकडे व्यक्त करीत आहेत. अनेक व्यक्ती दिवाळी आपल्या घरी साजरी करून तसेच गोडधोड खावून सासरी जाण्याच्या तयारीत आहेत. बहिणींना भावाला (भाऊबीज) ओवाळणी घालण्याकरिता ओढ असल्याने भाऊबीजनिमित्त बहिणींनी आपल्या भावाचे घर गाठून मुक्काम ठोकला आहे.
दिवाळी आटोपल्यानंतर लगेच ग्रामीण भागात मंडईला सुरूवात होते. मंडईत दिवसा दंडारी असतात. नाच, गाणे मंडईत सुरू असते. त्यामुळे मंडईची परंपरा नेहमीच दिवाळी झाल्यानंतर सुरू असते. युवा पिढीतील तरुण व तरूणी या मंडईचा मजा काही वेगळ्या पध्दतीने घेतात. मंडई निमित्ताने काही जुने मित्र तसेच जुन्या मैत्रीनींच्या भेटीगाठी होतात. जो व्यक्ती गाव सोडून बाहेरगावी नोकरी करीत असतो, तोसुद्धा मंडईच्या दिवशी सुट्ट्या काढून गावी परततो. अनेक पाहुणे मंडळी मंडई निमित्ताने एकमेकांकडे जातात. सर्वत्र पाहुण्यांची चाहूल दिसत असते. या वेळी गोड पदार्थ खाण्याची अधिक संधी इतरांना मिळते.
मंडईतील लहान मुलांचे खेळणे म्हणजे फुगे, हे विशेष. रात्रीला प्रत्येक गावी मंडई निमित्ताने नाटक, तमाशा, धमाका, आर्केस्ट्रा व इतर कार्यक्रम मनोरंजनासाठी होतात. ही दरवर्षीची परंपरा यंदाही सुरू आहे. यातही अनेक व्यक्ती रात्रभर बसून आपला मनोरंजन करतात. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या मंडईला ज्वर चढला आहे. दिवाळीची रोषणाई संपत नाही तोच मंडईची धूम सुरू झाली. सर्वत्र मंडईच्या आयोजनाने गावकऱ्यांच्या आनंदात व उत्साहात भर पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी मंडईचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गावात मंडईच्या निमित्ताने गावकऱ्यांना मेजवानी मिळत आहे.
झाडीपट्टीमध्ये मंडईला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दिवाळीचा पर्व संपला की लगेच मंडईला सुरूवात होते. या मंडईनिमित्त गावात आप्तस्वकीय नातेवाईक येतात. त्यामुळे एकमेकांच्या भेटीगाठी होऊन आनंद साजरा केला जातो. तसेच मंडईनिमित्ताने उपवर-वधूच्या शोधाचे कार्य केले जाते. येथूनच विवाह जुळविण्याच्या कार्याला प्रारंभ होतो. त्यातच इंटरनेट, टी.व्ही., कंप्युटरच्या युगात मनोरंजनाची साधने उपलब्ध असली तरी ग्रामीण भागाने आपली पारंपरिक संस्कृती जोपासण्यासाठी पूर्वीच्या काळात निखळ मनोरंजन करणाऱ्या लोककलांचे आयोजन केले जाते. ही लोककला, गोंधळ, तमाशा व नाटके आजही विरंगुळा मिळवून देत आहेत. मंडईनिमित्त नाटकांचे आयोजन करण्यात येत आहे. या नाटकांव्दारे सामाजिक प्रबोधनातून निखळ मनोरंजनाचे कार्य होत आहे. त्यातून परिसरातील लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Melting fever rises in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.