स्थायी समितीची सभा शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:10 IST2018-04-08T22:10:33+5:302018-04-08T22:10:33+5:30
शुक्रवारी (दि.६) बोलाविण्यात आलेली नगर परिषद स्थायी समितीची सभा स्थगित करण्यात आली होती. आता ही सभा येत्या शुक्रवारी (दि.१३) होत असल्याची माहिती आहे. ३४ विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली आहे.

स्थायी समितीची सभा शुक्रवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शुक्रवारी (दि.६) बोलाविण्यात आलेली नगर परिषद स्थायी समितीची सभा स्थगित करण्यात आली होती. आता ही सभा येत्या शुक्रवारी (दि.१३) होत असल्याची माहिती आहे. ३४ विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली आहे.
नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शुक्रवारी (दि.६) स्थायी समितीची सभा बोलाविली होती. एकूण ३४ विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली होती. यामध्ये विविध विभागांतील विषयांचा समावेश असून काही विषय महत्वाचे दिसून येत आहेत. महत्वाचे विषय म्हणावयाचे झाल्यास, शहरातील प्रत्येक प्रभागात हायमास्ट लाईट लावणे, वीज वितरण कंपनीचे केबल अंडरग्राऊंड करणे, अग्निशमन विभागात कंत्राटी तत्वावर फायरमन व वाहनचालक घेणे, सभांना उपस्थित राहणाऱ्या नगर परिषद सदस्यांची अल्पाहार व्यवस्था करण्यासाठी निधी ठरविणे, नगर परिषद क्षेत्रात वृक्षारोपण करणे, पाणी टंचाई लक्षात घेत विंधन विहीर खोदकामावर आलेल्या खर्चाला मंजुरी देणे आदि विषयांचा समावेश आहे.
मात्र भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आल्याने भाजपचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईला गेले होते. परिणामी ६ तारखेची सभा स्थगित करण्यात आली होती. आता ही सभा येत्या शुक्रवारी (दि.१३) घेतली जाणार आहे.
बाजार वसुली निविदेकडे सर्वांच्या नजरा
स्थायी समितीच्या सभेत महत्वाचे विषय मांडले जात असतानाच सध्या बाजार वसुली निविदेचा विषय नगर परिषद वर्तुळात चर्चेत आहे. नगर परिषदेने बाजार वसुलीसाठी निविदा काढली. तर या प्रकाराला विरोधी पक्षातील कॉंग्रेसच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभेत दोन्ही पक्ष आमने-सामने येणार असल्याने हा विषय चांगलाच गाजणार असल्याचेही दिसत आहे.