नदीत फेकली बालकांची औषधी
By Admin | Updated: November 2, 2015 01:24 IST2015-11-02T01:24:35+5:302015-11-02T01:24:35+5:30
आमगाव मार्गावर असलेल्या पांगोली नदीच्या पुलाखाली बालकांची औषधी उघड्यावर फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नदीत फेकली बालकांची औषधी
गोंदिया : आमगाव मार्गावर असलेल्या पांगोली नदीच्या पुलाखाली बालकांची औषधी उघड्यावर फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेकण्यात आलेली ही औषधी मुदतबाह्य असली तरी तिला जमीनीत न पुरता उघड्यावर फेकण्यात आल्याने मात्र एकच खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात औषधी उड्यावर फेकण्याचे प्रकार काही नविन नाही. मात्र उघड्यावर फेकण्यात आलेल्या या औषधींमुळे यापासून धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया जिल्ह्याच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सन २०१० मध्ये फेरोफोला नावाची बालकांची औषधी उघड्यावर फेकण्यात आली होती. त्या प्रकरणात सहा. जिल्हा शल्यचिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच औषध निर्माता असे १४ कर्मचारी निलंबित झाले होते. हा प्रकार जूना नसताना तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथेही औषधी उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरूच आहे.
एकामागे एक असे प्रकार घडत असतानाच त्यात भर घालत आमगाव मार्गावरील पांगोली नदीच्या पुलाखाली बालकांची आर बी टोन, झायमेक्स, बोनीसपाझ अशी औषधी उघड्यावर टाकण्यात आल्याचे दिसून आले. ही औषधी खासगी मेडिकलमधील आहे किंवा शासकीय आहे हे स्पष्ट झाले नसले तरी ही मुदतबाह्य औषधी विल्हेवाट लावण्याच्या उद्देशातून पांगोली नदीच्या वाहत्या पाण्यात टाकण्यात आल्याचे समजते. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात कोठेही व केव्हाही औषध फेकण्यात येत असल्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत.
आता या प्रकरणात आरोग्य विभाग काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
वडेगावचे औषध प्रकरण डीएचआेंच्या दालनात
वडेगाव येथील बेवारस फेकलेल्या औषध प्रकरणाबाबत तालुका व जिल्हास्तरीय चौकशी करून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांच्याकडे सादर करण्यात आला. परंतु या प्रकरणात कोण दोषी? औषधी आली कोठून या संदर्भात कसलीही माहिती माध्यमांना मिळाली नाही.