५०० रूग्णांवर औषधोपचार
By Admin | Updated: October 14, 2015 02:31 IST2015-10-14T02:31:23+5:302015-10-14T02:31:23+5:30
माहुरकुडा प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल यांच्या सहकार्याने मोरगाव येथील रोगनिदान शिबिराचा लाभ

५०० रूग्णांवर औषधोपचार
अर्जुनी-मोरगाव : माहुरकुडा प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल यांच्या सहकार्याने मोरगाव येथील रोगनिदान शिबिराचा लाभ परिसरातील ५०० च्यावर लोकांनी घेतला. ब्रह्मपुरी येथील विविध रोगांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून आरोग्य तपासणी करुन मोफत औषध वितरित करण्यात आली. तसेच काहींना संदर्भ सेवेचा सल्ला देण्यात आला.
गोंदिया जिल्हा परिषदेचे माहुरकुडा क्षेत्राचे जि.प. सदस्य गिरिश पालिवाल तसेच ग्रामपंचायत मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोरगावच्या जि.प. शाळेत रोगनिदान शिबिर रविवार (दि.११) करण्यात आले. उद्घाटन जि.प. सदस्य गिरिश पालीवाल यांच्या हस्ते सरपंच भूमिता लोधी, पं.स. सदस्य नाना मेश्राम, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य यशवंत परशुरामकर, उपसरपंच राजू पालीवाल, मुख्याध्यापक सुखदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा परिषद प्रभागातील सर्वसामान्य जनतेला लागण झालेल्या रोगांची माहिती व्हावी, रोगावर सल्ला व उपचार होण्याच्या हेतूने जि.प. सदस्य गिरिश पालिवाल यांनी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ.एस.के. नारिंगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अंजली नारिगे, सर्जन डॉ. सौरभ कुंभारे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. कुणाल फटिंग, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. नितीन कोळवते, बालरोग तज्ज्ञ डॉ.पी.एस. राव, जनरल फिजिशियन डॉ. एन.ए. चव्हाण उपस्थित होते. त्यांच्याकडून माहुरकुडा, मोरगाव, मालकनपुर, तावशी, कवठा, खैरी, सिरोली या ठिकाणाहून आलेल्या ५०० महिला, पुरूष, बालक यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. काहींना पुढील तपासणी करण्यासाठी ख्रिस्तानंद रुग्णालय ब्रम्हपुरी येथे येण्याचा सल्ला देण्यात आला. आरोग्य तपासणी करणाऱ्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.
शिबिरासाठी ख्रिस्तानंद रुग्णालयाचे सामाजिक कार्यकर्ता हरिश्चंद्र तलमले, श्रीनिवास, पायल धुर्वे, सारिका बुंदे, रिता खोब्रागडे, सीमा कुत्तरमारे यांनी सहकार्य केले. नव्यानेच निवडून आलेले जि.प. सदस्य गिरिश पालिवाल यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून परिसरातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे. (शहर प्रतिनिधी)