मास्कने लिपस्टीकची लाली घालविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST2021-04-30T04:37:00+5:302021-04-30T04:37:00+5:30
गोंदिया : कुठलेही कार्यक्रम असोत महिला सजने, सवरण्याचे काम करतात. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कॉस्मेटीक लागतो. परंतु मागील वर्षभरातपासून ...

मास्कने लिपस्टीकची लाली घालविली!
गोंदिया : कुठलेही कार्यक्रम असोत महिला सजने, सवरण्याचे काम करतात. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कॉस्मेटीक लागतो. परंतु मागील वर्षभरातपासून कोरोनाने थैमान घातल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदीच होती. लग्न समारंभही साधेपणातच साजरे करण्यात आले. कोरोनाच्या संकटात महिलांचा कॉस्मेटीकचा वापरही कमी झाला आहे. महिलांनी कॉस्मेटीक लावली तरी त्यावर मास्क वापरले की कॉस्मेटीकचा काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे कॉस्मेटीकची मजा मास्कने घालवली आहे. कोरोनाच्या संकटात वर्षभरापासून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. २४ तास घरातच घालविल्याने कॉस्मेटीकचा त्यांचा वापरही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. काही काही महिलांनी तर सहा महिन्यापासून लिपस्टीकच्या बॉटलला हातही लावला नाही. मागच्या वर्षी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर काही लग्न समारंभाला सुरूवात झाली होती. त्यामध्ये काही प्रमाणात कॉस्मेटीची मागणी होत होती. परंतु पुन्हा कोरोनाने डोके वर उचलले आणि काॅस्मेटीकची मागणी कमी झाली.
.........................
२४ तास घरातच ब्यूटीपार्लर कशाला?
कोरोनाच्या संकटामुळे सर्व महिला मंडळी २४ तास घरातच राहात आहेत. त्यामुळे त्यांना ब्यूटीपार्लरमध्ये येण्याची गरजच पडत नाही. सार्वजनिक कार्यक्रम बंद, लग्न समारंभ कमी लोकांमध्ये करायचे त्यामुळे कोरोनाला घेऊन महिलांनी यावर्षी ब्यूटीपार्लरकडे दुर्लक्ष केले आहे.
-पूजा नरेश बोहरे, ब्यूटी पार्लर चालक, रिसामा.
......
शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत कुठल्याही कार्यक्रमात महिलांना सजून जाण्यासाठी त्या ब्यूटीपार्लरचा आधार घेत. त्यातून दोन पैसे आम्हालाही मिळत. आमचा घर चालायचा. परंतु कोरोनाच्या संकटाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंद, लग्न, वास्तूपूजन, वाढदिवस आणि अन्य कार्यक्रम कमी लोकांमध्येच करा अश्या शासनाच्या सूचनांमुळे महिला ब्यूटीपार्लरकडे मागच्या वर्षी क्वचितच आल्या.
- अश्वीनी खोटेले, ब्यूटी पार्लर चालक, सडक-अर्जुनी.
.............................
दरवर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षीपासून कॉस्मेटीकच्या विक्रीत मोठी घट झाली. आम्ही सन २०१९ ला केलेली विक्री आजही आठवण करता्े. सन २०१९ ला आणलेले कॉस्मेटीकचे साहित्य सन २०२० मध्ये विक्रीलाच गेले नाही. कोरोनामुळे महिलांचा कॉस्मेटीकचा वापर खूप कमी प्रमाणात झाला आहे. कोरोनामुळे महिला बाहेर निघत नसल्यामुळे आमचे खूप नुकसान झाले.
- सोपान जीभकाटे, कॉस्मेटीक विक्रेते, आमगाव.
.......
यंदा नात्यात लग्न समारंभ झाले तरी कोरोनामुळे आम्ही ब्यूटीपार्लरमध्ये जाणे टाळले. ब्यूटीपार्लरमध्ये जाणे आणि कोरोनाचा संसर्ग होईल या भितीपोटी आम्ही ब्यूटीपार्लरमध्ये गेलेच नाही. वर्षभरापासून आम्ही ब्यूटीपार्लरचे दर्शन घेतले नाही.
शालीनी खोटेले, कोहळीटोला आदर्श
......
लग्न समारंभ कमी झाले आणि ज्यांच्याकडे लग्न झाले तेही कमी लोकांत करण्यात आले. त्यामुळे लग्नाला जाण्याचे कमी प्रसंग आले. यात कोरोनाची भिती वर्षभरापासून असल्यामुळे आम्ही ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचे टाळले आहे.
ज्योती भेंडारकर, अर्जुनी-मोरगाव.