लग्नाचा आनंद बदलला विलापात, विवाह स्थगित
By Admin | Updated: December 22, 2016 00:55 IST2016-12-22T00:55:52+5:302016-12-22T00:55:52+5:30
गोरेलाल चौकातील बिंदल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत अजमेरा कुटुंबातील दोन जावयांचा मृत्यू झाला.

लग्नाचा आनंद बदलला विलापात, विवाह स्थगित
गोंदिया : गोरेलाल चौकातील बिंदल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत अजमेरा कुटुंबातील दोन जावयांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजमेरा कुटुंबातील विवाह समारंभही स्थगित करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंकज साडी सेंटरचे मालक चिनू अजमेरा यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा अॅड. प्रणव दुर्ग येथील परिवातील मुलीसह २१ डिसेंबरला दुपारी १ वाजता देवरी येथील रूप रिसोर्टमध्ये विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात सहभागी होण्यासाठी अजमेरा परिवाराचे जावई इंदोर येथील रहिवासी रविंद्र जैन (५४) व महू येथील रहिवासी सुरेंद्र हिरालाल सोनी (६३) गोंदिया आले होते. दोन्ही हॉटेल बिंदल प्लाझा येथे २० डिसेंबरच्या रात्रीला थांबले होते. २१ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजता ते देवरीसाठी निघणार होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.तेथेच दुर्गवरून मुलीच्या पक्षाकडील मंडळीसुद्धा देवरीला पोहोचणार होते. देवरी येथील रूप रिसोर्टमध्ये लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. जावई देवरीला निघण्यापूर्वीच भीषण अग्नितांडव घडले. त्यात सदर दोघांचा मृत्यू झाला.
हॉटेलमधून मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तेथे उत्तरीय तपासणीनंतर अजमेरा कुटुंबीयांचे नातलग आपल्या जावयांचे मृतदेह घेवून रवाना झाले. प्रकाशचंद्र अजमेरा कुटुंबात दोन मुली होत्या. दोन्ही मुलींच्या पतींच्या मृत्यूमुळे अजमेरा कुटुंबीय शोकमग्न झाला आहे. विवाह कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे.