शहरातील अतिक्रमणाची होणार ‘मार्किंग’

By Admin | Updated: April 17, 2017 00:57 IST2017-04-17T00:57:52+5:302017-04-17T00:57:52+5:30

शहरात कोणत्या ठिकाणी किती जागेवर अतिक्र मण वाढले आहे याची अचूक माहिती व्हावी यासाठी शहरातील ...

'Marking' of encroachment in city | शहरातील अतिक्रमणाची होणार ‘मार्किंग’

शहरातील अतिक्रमणाची होणार ‘मार्किंग’

मिळणार अचूक माहिती : एसडीओच घेणार पुढाकार
कपिल केकत  गोंदिया
शहरात कोणत्या ठिकाणी किती जागेवर अतिक्र मण वाढले आहे याची अचूक माहिती व्हावी यासाठी शहरातील अतिक्रमणाची ‘मार्कींग’ केली जाणार आहे. ‘मार्कींग’च्या या प्रयोगाने नगर परिषदेला किती जागेवर अतिक्रमण असून किती अतिक्रमण काढायचे आहे याची अचूक माहिती मिळणार असून अतिक्रमण हटाव मोहिमेला यातून मदत मिळणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी लवकरच मोहिम हाती घेणार असल्याचे कळले.
शहरात अतिक्रमण ही एक गंभीर समस्या बनली असून अतिक्रमाणाचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेकडून कित्येकदा मोहिम राबविण्यात आली. मात्र एक-दोन दिवसांत मोहिम बंद पडते व अतिक्रमणाची स्थिती पुन्हा जैसे थे होते. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेत कारवाई केली. यात मात्र काही व्यापाऱ्यांनी पत्रकार, पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांनाच मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर अतिक्रमण हटविण्याची मोहिम पुन्हा बंद पडली. एकंदर अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला कोठेतरी ग्रहण लागते ते काम अर्धवट पडून राहते. अशात काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा तसेच होते.
अतिक्रमणामुळे शहर विद्रुप झाले असून आज नागरिकांना रस्त्यावर चालायसाठीही जागा नाही. बाजारात ही स्थिती अधिकच बिकट असून येथे दर तासाने ट्राफीक जाम होते. परिणामी बाजारात येणे म्हणजे डोकेदुखी अशा प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. एखादे चारचाकी वाहन बाजारात शिरताच अवघा रस्ताच अडकून पडतो अशी येथील स्थिती आहे. यातूनच बाजारातील रस्त्यांच्या रूंदीचा अंदाज लावता येतो. येथेच हा प्रकार संपत नसून शहरातील अन्य भागांतही अतिक्रमण फोफावल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. कित्येकांनी नाल्यांवरही अतिक्रमण करून नाल्याच गिळंकृत केल्याचे चित्र ही शहरात नवखे नाही. यामुळेच शहरवासीयांची स्थिती आज अडकून पडल्यासारखी झाली आहे.
अतिक्रमणाच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी नगर परिषद मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांत चर्चा झाली असून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सर्वेअर कडून शहरातील अतिक्रमणाची ‘मार्किंग’ करण्याचा प्रयोग अंंमलात आणण्याचे सूचविले आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना विचारले असता, अतिक्रमणाच्या ‘मार्कींग’साठी नगर परिषदेकडून कोणतीही लेखी स्वरूपात मागणी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र काही वर्षांपूर्वी शहरात अशाच प्रकारे अतिक्रमीत क्षेत्र दाखविण्यासाठी लाल पट्टा मारून त्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. आता तोच प्रकार यंदाही अंमलात आणून शहरातील अतिक्रमणाची ‘मार्कींग’ केली जाणार आहे. यामुळे अतिक्रमण धारकांनाही त्यांच अतिक्रमण हटविण्याची तसेच आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. परिणामी मोहिम राबविताना वादविवाद होणार नाहीत.

१ मे पासून प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता
अतिक्रमण मार्किंग करण्याच्या या प्र्रक्रियेला १ मे पासून सुरूवात होण्याची शक्यता उप विभागीय अधिकारी वालस्कर यांनी वर्तविली. ते १५ दिवस सुट्यांवर जाणार असल्याने आल्यावर याची सुरूवात करणार असे त्यांनी सांगितले; मात्र या विषयावर झालेल्या चर्चेनंतर अद्याप नगर परिषद प्रशासनाकडून लेखी स्वरूपात काहीच कळविण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या विषयात ढिलाइचे धोरण अवलंबले जात असल्याचेही दिसून येते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

Web Title: 'Marking' of encroachment in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.