बाजार समिती झाली ‘आंबट-गोड’
By Admin | Updated: April 26, 2017 00:42 IST2017-04-26T00:42:01+5:302017-04-26T00:42:01+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंचच चिंच दिसून येत आहे. जिल्ह्याच्या

बाजार समिती झाली ‘आंबट-गोड’
चिंचेची आवक सुरू : क्विंटलला पाच ते सात हजार भाव, यंदा उत्पन्न कमी होणार
गोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंचच चिंच दिसून येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह लगतच्या जिल्ह्यांमधून गोंदिया बाजार समितीत चिंचेची आवक होत आहे. सध्या पाच ते सात हजार रूपये क्विंटलपर्यंत चिंचेला भाव मिळत आहे. त्यामुळे चिंचेने व्यापून गेलेली बाजार समिती ‘आंबट-गोड’ झाली आहे.
चिंच म्हणताच तिच्या आंबटगोड चवीमुळे तोंडाला पाणी सुटते. चिंचही रानमेव्यातील एक प्रकार असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिंचेचे उत्पादन होते. धानाचा हा जिल्हा असला तरीही चिंचही मोठ्या प्रमाणात निघत असल्यामुळे जिल्ह्याची चिंचेसाठीही ख्याती आहे. येथील चिंच दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यात पाठविली जाते. चिंचेची बाजारपेठ बघता लगतच्या राज्यांतूनही चिंच येथील बाजार समितीत विक्र ीसाठी येते अशी माहिती आहे.
एरवी धानाने भरून असलेल्या येथील बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंच दिसून येत आहे. शेडमध्ये ठिकठिकाणी चिंचेचे फड लागून ठेवलेले बघावयास मिळत आहे. चिंचेची आवक होत असल्याने एकंदर बाजार समिती चिंचमय झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
मागील वर्षीच्या तुलनेत घट
ामागील वर्षी बाजार समिती दररोज २०० ते २५० पोती चिंचेची आवक होत होती. यंदा मात्र चिंचेचे उत्पादन घटल्याने बाजार समितीत पाहिजे त्या प्रमाणात चिंच विक्रीला येत नसल्याने बाजार समितीकडून सांगण्यात आले. सध्या चिंचेला पाच हजार रूपये क्विंटलपासून भाव मिळत आहे. तर चांगल्या चिंचेला सात हजार रूपयांपर्यंतही भाव मिळत आहे. मात्र यंदा दिवसाला फक्त १५-२० पोती चिंचेची आवक असून काही दिवसात ही आवक वाढण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेश व छत्तीसगडमधून आवक
येथील बाजार समितीत चिंचेला चांगला भाव मिळत असल्याने बाजार समितीचे क्षेत्र सोडून जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी आपली चिंच येथील बाजार समितीत आणतात. एवढेच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, बरघाट, वारासिवनी, किरनापूर, लांजीसह अन्य भागांतून व छत्तीसगड राज्यातील डोंगरगड व परिसरातूनही मोठ्या प्रमाणात चिंच येथील बाजार समितीत येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यंदा मात्र चिंंचेचे उत्पादन कमी झाल्याने बाजार समितीत सध्या तालुक्यातील ग्रामीण भागातूनच चिंच येत आहे.