अनेकांवर निवडणुकीपासून वंचित राहण्याची पाळी
By Admin | Updated: May 8, 2015 00:59 IST2015-05-08T00:59:48+5:302015-05-08T00:59:48+5:30
गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या

अनेकांवर निवडणुकीपासून वंचित राहण्याची पाळी
बोंडगावदेवी : गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे शक्तीचे करण्यात आले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागजपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर केल्यानंतरही दोन वर्षाचा कालावधी लोटून जावून सुध्दा अजूनपावेतो सबंधित अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही अशी तालुक्यात सर्वत्र ओरड आहे.
अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागामधील सबंधित लिपीकाकडे जात पडताळणी प्रमाणपत्रांचे काम सोपविले असल्याचे समजते. तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी काही ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या. ग्रामपंचायतच्या निवडणुकीतील राखीव प्रभागातून उमेदवारी भरणाऱ्या इच्छुकांनी सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्जानिशी जात पडताळणी प्रमाणपत्राची फाईल तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातील सबंधीत लिपीकाकडे दोन वर्षापूर्वीच सादर केल्या. जात पडताळणी प्रस्ताव सादर करणाऱ्या अर्जदारापैकी काही जन निवडुणकीमध्ये निवडून सुध्दा आले. अर्धा कालावधी संपत आला. परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र मात्र अजून त्या अर्जदाराच्या हाती मिळालाच नाही, अशी ओरड तालुक्यात सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या उमेदवारांनी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून आले. त्यांना सुध्दा अजून पावेतो जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही.
तहसील कार्यालयातील सबंधीत लिपीक उडवा-उडवीचे उत्तर देऊन वेळ मारुन नेत असल्याची कैफीयत प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी मांडली. दोन वर्षापूर्वी सादर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव संबधीत लिपीकाच्या कपाटामध्ये धूळखात पडून असल्याचे बोलल्या जात आहे. प्रस्ताव सादर करून दोन वर्षाचा कालावधी लोटून सुध्दा अर्जदाराच्या जात पडताळणी प्रस्तावाला गती येत नाही. त्या प्रस्तावाकडे सबंधीत विभाग ढूंकून सुध्दा पाहत नाही. याला सर्वस्वी जबाबदार संबधीत विभागाला धरण्यात यावी अशी मागणी अर्जदार करित आहेत. सर्व कागदपत्राची पूर्तता करून सुध्दा जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेच्या आत मिळत नसल्याने, अनेकांना निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे आजही तालुक्यातील ग्रामपंचायतच्या काही राखीव जागा रिक्त असल्याचे समजते. येत्या काही दिवसात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सदर निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र नामांकन अर्ज भरतानी सादर करणे आवश्यक राहणार आहे.