जिल्हा आरोग्य विभागात अनेक पदे रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:07+5:302021-04-24T04:29:07+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाला सर्व मंजूर पदे भरण्यात यावीत, ...

जिल्हा आरोग्य विभागात अनेक पदे रिक्तच
गोंदिया : कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाला सर्व मंजूर पदे भरण्यात यावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मंजूर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवूनही योग्यतेचे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यात संसर्गामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढत चालला आहे. त्यातच आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. गोंदिया जिल्हा आरोग्य विभागासाठी ६ फिजिशियन डॉक्टरांची मंजुरी आहे. दोन भूलतज्ज्ञ डॉक्टर व १० एमबीबीएस अर्हताधारक डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यासाठी दोन वेळा पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, फिजिशियन व भूलतज्ज्ञ डॉक्टरच्या पदांसाठी एकही उमेदवार आला नाही, तर एमबीबीएस डॉक्टरच्या १० पदांपैकी २ पदे भरण्यात आली. त्याचप्रमाणे ८० स्टाफ नर्सपैकी ५५ पदे भरण्यात आली, तसेच आणखी १४ पदांवर लवकरच उमेदवार रुजू होणार आहेत. त्याचप्रमाणे लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन व डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्यात आली आहेत. आवश्यक ती पदे लवकरच भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.