तालुक्यातील अनेक तलाव अतिक्र मणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:00:44+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून तलाव तयार केले. तालुक्यातील प्रत्येक गावात तलाव आहेत. मात्र सन १९७१ मध्ये अर्जुनी-मोर तालुक्यात इटियाडोह धरण अस्तित्वात आले.

तालुक्यातील अनेक तलाव अतिक्र मणाच्या विळख्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात अनेक तलाव असून त्यांच्या संवर्धनाकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने त्यावरील अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी या तलावांचा शेतकऱ्यांना सुध्दा उपयोग होत नसून शासनाच्या लाखो रुपयांच्या संपत्तीवर अतिक्रमण करून काहीजण डल्ला मारत असल्याचे चित्र आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून तलाव तयार केले. तालुक्यातील प्रत्येक गावात तलाव आहेत. मात्र सन १९७१ मध्ये अर्जुनी-मोर तालुक्यात इटियाडोह धरण अस्तित्वात आले. यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावांना शेतीला सिंचन करण्यासाठी मदत झाली.
मात्र तलावांच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे यावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हळूहळू या तलावाचे क्षेत्र कमी होत चालले आहे.
त्यामुळे या तलावांचा आता सिंचनासाठी उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. तर काही तलावाच्या क्षेत्रातील जमीन आपल्या सातबारावर चढवून घेतली आहे. तलावांचे क्षेत्रफळ कमी झाल्याने तलावांची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे.
परिणामी पाणी टंचाईच्या समस्येत सुध्दा वाढ होत आहे.पूर्वजांनी निर्माण केलेले तलाव सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांनी पटवारी व खंडविकास अधिकाऱ्यांना तलावांची संपूर्ण माहिती मागीतली. त्यामुळे आता तलावांच्या संवर्धनासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या जातात याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेने तलावांची मोजणी करण्यासाठी निधी द्यावा. तलावांची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे पैसे भरावे लागत आहे. मोजणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काही तलावांची कामे झालेली आहेत.
- सुभाष घरतकर, उपविभागीय अधिकारी लघुपाटबंधारे विभाग.