अर्जुनीतील अनेकांच्या घरांवर होता ‘त्यांचा’ डोळा

By Admin | Updated: September 11, 2015 02:05 IST2015-09-11T02:05:12+5:302015-09-11T02:05:12+5:30

अर्जुनी मोरगाव येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्याच्या पत्नीची हत्या करून दागिने व रोख रक्कम लुटण्याच्या घटनेला आता दोन महिने पूर्ण झालेत.

Many of Arjuna's houses were 'their' eyes | अर्जुनीतील अनेकांच्या घरांवर होता ‘त्यांचा’ डोळा

अर्जुनीतील अनेकांच्या घरांवर होता ‘त्यांचा’ डोळा

थराराच्या आठवणी ताज्या : मृत्युच्या दाढेतून बचावल्याची अनेकांना अनुभूती
संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव
अर्जुनी मोरगाव येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्याच्या पत्नीची हत्या करून दागिने व रोख रक्कम लुटण्याच्या घटनेला आता दोन महिने पूर्ण झालेत. या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी या आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबातून एकेक किस्से बाहेर येत आहेत. पशिने यांच्या घरात डाव साधण्याआधी या आरोपींची आणखी काही घरांवर नजर होती. मात्र नशिब बलवत्तर म्हणून ते या मारेकऱ्यांच्या तावडीत सापडले नाहीत. मृत्युच्या दाढेतून बचावल्याचीच अनुभूती यातून अनेकांना झाली.
‘अतिथी देवो भव’ अशी आपली संस्कृती आहे. घरी येणाऱ्यांचा मानसन्मान, आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे. आज आपल्याकडे मैत्रिणी येणार, हितगुज होईल, त्यांना फराळ खाऊ घालणार अशा बेतात घरात नितू पशिने यांची आवरासावर सुरू होती. पण काही क्षणातच या आनंदावर विरजण पडणार, काळ दाराशी उभा आहे याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. अखेर ‘यमदूत’ बनून आलेल्या त्या मारेकऱ्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि क्षणार्धात सार काही संपलं.
९ जुलैचा तो दिवस. कापगते कॉम्प्लेक्सच्या गजबजलेल्या वस्तीत नितू पशिनेचे वास्तव्य होते. पती सुरेश पशिने यांचे बाजारात इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दुकान आहे. ते नित्याप्रमाणे सकाळी दुकानात गेले. मुले नागपूरला शिकायला होती. नितू घरी एकटीच होती. दुपारी २ वाजता नितूच्या घरी महिलांची ‘किटी पार्टी’ होणार होती. दुपारी २.२० च्या दरम्यान त्या महिला नितुच्या घरी आल्या. मात्र दरवाजा कुणीच उघडत नाही म्हणून आपण आत बसू म्हणून महिलांनी दार उघडले. त्यावेळी नितू रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाक खोलीत पडलेली होती. नितूची कोणीतरी धारदार शस्त्राने डोक्यावर घाव घालून हत्या केली होती. ही बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. लगेच पोलीसही पोहोचले. कपाट उघडे होते. सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. ही चोरी किंवा दरोड्याचा प्रकार असावा असे बोलल्या जात होते. मात्र नितूच्या अंगावरील दागिने शाबूत असल्याने संभ्रम होता. घटनास्थळी एकही पुरावा नव्हता. त्यामुळे हा सुनियोजित हत्येचा कट तर नाही, अशीही शंका व्यक्त केली जात होती. हा पेच सोडविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, राजेश गजल, उपनिरीक्षक रत्नदीप साळुंके यांनी या गुंतागुंतीच्या ठरत असलेल्या प्रकरणाचा पेच सोडविण्याचे आव्हान स्वीकारले. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची चमू पोलीस निरीक्षक रन्नावरे यांच्या नेतृत्वात दाखल झाली. या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र एक केली. बारीकसारीक बाबींवर लक्ष केंद्रीत करून विविध पैलूंवर तपास केला. अनेक संशयितांना तपासले. घटनेच्या दिवशीचे त्या वेळेतील मोबाईल टॉवर लोकेशन तपासले. मात्र रेल्वेगाड्यांच्या आवागमनामुळे व्यत्यय येत होता. अनेक बाबी तपासताना आपण निष्कर्षाप्रत पोहोचलो, आता आरोपी मिळणार, असे वाटत असतानाच पदरी निराशा पडत होती.
गुप्त पध्दतीने माहिती कळविण्यासाठी पोलिसांनी छापील पत्रके वाटून जनतेला आवाहन केले. यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. तेवढ्यात भंडारा येथील हत्याकांड घडले. त्या व अर्जुनी मोरगाव येथील घटनेत बरेच साम्य होते. दोन दिवसातच भंडाऱ्याच्या घटनेतील आरोपी सापडले. त्यामुळे अर्जुनी पोलिसांचे एक पथक तिथे जाऊन आले. मात्र तेथील तपास पूर्ण न झाल्यामुळे आरोपींना ताब्यात घेण्यास विलंब झाला. आरोपीनी अर्जुनी मोरगाव येथील घटनेची कबुली भंडारा पोलिसांनी दिली नसल्याने आरोपींबद्दल संभ्रम होता. शेवटी २५ आॅगस्ट रोजी त्या आरोपींना येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. हत्येच्या वेळी वापरलेली दुचाकी व हातोडी पोलिसांनी हस्तगत केली.
या तपासकामात स्थानिक पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, राजेश गज्जल, पोलीस नायक थेर, शिंदे तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक रन्नावरे, दमाहे, लुटे, जाधव यांनी मोलाची भूमिका पार पाडली. अर्जुनीवासीयांना दहशतीच्या विळख्यातून बाहेर काढले. जर या घटनेचा सुगावा लागला नसता तर आणखी अनेक निष्पाप बळी गेले असते, असा सूर व्यक्त केला जात आहे.
आरोपी हे वॉशिंग मशिन, एअरकंडीशनर व फ्रीज दुरूस्तीची कामे करीत असत. गोंदिया येथील एका नातलगासोबत जाऊन यापैकी एका आरोपीने दुरूस्तीची कामे शिकून घेतली होती. मृतक नितूचे पती हे सुध्दा दुरूस्तीची कामे गोंदियाच्या मेकॅनिकलकडे सोपवित होते. तो काही कामे आरोपीपैकी एकाला सोपवित होता. आरोपींनी येथील अनेकांच्या घरी ए.सी.बसवून दिले होते. त्यामुळे त्यांना त्या घरातील इत्यंभूत माहिती होती.
अन् त्यांनी वळविला पशिनेंच्या घराकडे मोर्चा
आरोपी हे जुगाराचे अट्टल शौकिन होते. हा शौक पूर्ण करण्यासाठी दुरूस्तीतून मिळणारा मेहनताना कमी पडत होता. त्यामुळे त्यांनी शक्कल लढविली. चोरी करण्याचा बेत आखला. ९ जुलै रोजी एका नातेवाईकाची दुचाकी घेऊन ते अर्जुनी मोरगाव येथे दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी तहसीलदारांचा बंगला हेरला. तिथे काही दिवसांपूर्वी त्यांनी एसी बसविले होते. मात्र तहसीलदार येथून बदलून गेल्यानंतर ते व्यापारी राकेश जायस्वाल यांच्या घरासमोर पोहोचले. तिथे रंगरंगोटीचे काम सुरू असल्याने माघारी परतले. त्यांनी मिरानगरी पिंजून काढली. त्यानंतर व्यापारी अरूण भट्या यांचे घरी पोहोचले. वर्दळ असल्याने तिथे त्यांची डाळ शिजली नाही. शेवटी सुरेश पशिने यांच्या गणेश ट्रेडर्सकडे मोर्चा वळविला. ते दुकानात बसून असल्याची खात्री करून त्यांच्या घराच्या दिशेने कुच केली.

Web Title: Many of Arjuna's houses were 'their' eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.