मनोहरभाई पटेलांनी समाजाला शिक्षित करण्याचे महान कार्य केले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:36+5:302021-02-10T04:29:36+5:30

गोंदिया : स्व. मनोहरभाई पटेल हे स्वत: शिक्षित नसताना गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालये सुरू करून या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ...

Manoharbhai Patel did a great job of educating the society () | मनोहरभाई पटेलांनी समाजाला शिक्षित करण्याचे महान कार्य केले ()

मनोहरभाई पटेलांनी समाजाला शिक्षित करण्याचे महान कार्य केले ()

गोंदिया : स्व. मनोहरभाई पटेल हे स्वत: शिक्षित नसताना गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालये सुरू करून या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. यामुळेच गुणवंत विद्यार्थी घडत असून, त्यांनी देश-विदेशात नाव कोरले आहे. मनोहरभाई पटेलांनी स्वत: अशिक्षित असल्याचा न्यूनगंड कधीच बाळगला नाही, तर समाज कसा शिक्षित करता येईल, या ध्येयाला प्रेरित होऊन कार्य केले. यासाठी त्यांनी तीव्र इच्छाशक्ती आणि समर्पणाची भावना जपल्यानेच त्यांना हे महान कार्य करता आले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्था, मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मनोहरभाई पटेल यांचा ११५ वा जयंती कार्यक्रम मंगळवारी (दि. ९) स्थानिक नमाद....... महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल हे होते. यावेळी आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, सहषराम कोरोटे, डॉ. नामदेव उसेंडी, नरेंद्र भोंडेकर, अभिजीत वंजारी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. राजेंद्र जैन, माजी खा. खुशाल बोपचे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, विलास शंगरपवार, अनिल बावनकर, के. आर. शेंडे, विजय शिवणकर उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सामाजिक कार्य करीत असताना समर्पण आणि त्यागाची भावना जपावी लागते. मनोहरभाई पटेल यांनीसुद्धा हाच धागा पकडून कार्य केले. त्यामुळेच त्यांना हे सर्व करता आले. ‘सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास’ हा मूलमंत्र जपून सर्वांनी कार्य केल्यास समाजाची प्रगती शक्य आहे. स्व. मनोहर पटेल यांनी शिक्षणरूपी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात करण्याचे कार्य खा. प्रफुल्ल पटेल हे करीत असून, ही खरोखरच गौरवाची बाब आहे. यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. खा. पटेल म्हणाले, स्व. मनाेहरभाई पटेल हे दृष्टी बाळगणारे होते. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शिक्षणाची गंगा आणून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे महान कार्य केले. आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असतो; पण या जयंती कार्यक्रमाचे फार वेगळे महत्त्व असून तो आमच्या भावनांशी जुडलेला असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.

......

या गुणवंतांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी अभ्यासक्रमात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्णपदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आस्था अनिलकुमार बिसेन व निष्ठा राजेशसिंह, श्रेया ओमप्रकाश रहांगडाले, ट्विंकल संजय उके, आदिती प्रेमकुमार भक्तवर्ती, जयेश पुरन रोचवानी, पुष्पा ग्यानसिंग लिल्हारे, रिया गोवर्धन नोतानी, साक्षी शैलेंद्र प्रसाद, अनिकेत दिलीप खंडारे, ऋतुजा जागेश्वर वाघाये, पूजा अश्विन मेहता, भाग्यश्री घनश्याम बोरकर, रोशनी पिजानी, रूपाली प्रदीप बुरडे, श्वेता अनिल पडोले आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता.

......

राज्यपालांनी केला मोदींचा गुणगौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हाच मूलमंत्र आत्मसात करून कार्य करीत आहेत. त्यांचे धडाडीचे निर्णय, दूरदृष्टी आणि आक्रमक शैलीमुळे भारताचे नाव आज सर्वत्र आदराने घेतले जाते. ही खरोखर देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. हाच मूलमंत्र सर्वांनी जोपासण्याची गरज असल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुणगौरव केला.

.......

मी दोन्ही जिल्ह्यांचा पालक- प्रफुल्ल पटेल

गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत कार्य करीत असताना आपण कधीच कुणाबद्दल भेदभावाची भावना बाळगून कार्य केले नाही, तर दोन्ही जिल्ह्यांचा पालक म्हणूनच सदैव कार्य करीत आहे. यापुढे सुद्धा या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, याच दृष्टीने आपले प्रयत्न असणार असल्याची ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

Web Title: Manoharbhai Patel did a great job of educating the society ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.