पक्षी अभयारण्य उभारण्याचा मानस
By Admin | Updated: December 21, 2015 01:48 IST2015-12-21T01:48:07+5:302015-12-21T01:48:07+5:30
गोंदिया जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असून जिल्ह्याच्या विविध भागात स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे दरवर्षी येतात.

पक्षी अभयारण्य उभारण्याचा मानस
राजकुमार बडोले : सारस महोत्सवाचा थाटात शुभारंभ
गोंदिया : गोंदिया जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असून जिल्ह्याच्या विविध भागात स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे दरवर्षी येतात. सारस महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात पक्ष्यांचे अभयारण्य निर्माण करण्याचा मानस असल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. जिल्हा पर्यटन समितीच्यावतीने आयोजित सारस फेस्टिव्हलच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव व पालक सचिव पी.एस. मीना, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे व उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. बडोले यांनी, सारस संवर्धनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोप पावत चाललेल्या सारस पक्षाचे संवर्धन करण्यासाठी जिल्हा पर्यटन समितीने घेतलेल्या पुढाकारास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सारसच्या निमित्ताने जिल्ह्यात येत असलेल्या विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांना भेटी देता याव्या, यासाठी पर्यटनाचे जिल्हा सर्किट तयार करण्यात येणार आहे. सारससाठी प्रसिद्ध भरतपूर पेक्षाही जास्त सारस व अन्य पक्ष्यांचे दर्शन जिल्ह्यात होते. यामुळेच जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगीतले.
वन्यजीव छायाचत्रकार शिवराम यांनी, सारस निमित्ताने गोंदियाला पर्यटन डेस्टीनेशन बनविण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगीतले. सारस संवर्धन ही कुणा एकाची जबाबदारी नसून सामुहिक आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून सारस म्हणजे गोंदिया ही ओळख देशभरातील पक्षिप्रेमींना होणार आहे. पक्षिप्रेमी छायाचित्रकारांसाठी गोंदिया अतिशय उपयुक्त व आदर्श ठिकाण असल्याचे सांगत, आपण येथे पक्षी संवर्धन या विषयावर कार्यशाळा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
पालक सचिव मिना यांनी, गोंदिया हे मिनी भरतपूर असल्याचे म्हणत, रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर होत असल्यामुळे सारसला याचा धोका होत असून त्यांची संख्या कमी होत आहे. यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी जैवीक शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन करीत पशुपक्ष्यांप्रती समाजात करूणा निर्माण झाली तरच पक्षी संवर्धनाचा हेतू यशस्वी होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी, सारस महोत्सवाची संकल्पना व उद्देश विषद करीत पर्यटनाला चालना देण्यासाठी सारस महोत्सव उपयुक्त ठरणार असल्याचे मत मांडले. गोंदिया सारस डेस्टीनेशन म्हणून प्रमोट करण्याचा हा प्रत्यन असून सारसमुळे जिल्ह्याला नवी ओळख मिळाली असल्याचे ते म्हणाले. तर सारस हा पक्ष्यांचा राजा असल्याचा उल्लेख करीत या महोत्सवाच्या माध्यमातून सारस राज्यातील तसेच देशातील असंख्य पक्षिप्रेमी व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
संचालन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व वन्यजीव प्रेमी मुकुंद धुर्वे यांनी केले. आभार उफपवनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी मानले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगांबर नेमाडे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा शक्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) शेखर कातोरे, बसस्थानकाचे आगारप्रमुख गौतम शेंडे, सामाजीक वनीकरणचे कुंभलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, वन्यजीव प्रेमी डॉ.राजेंद्र जैन, सावन बहेकार, सुनील धोटे, भरत जसानी, रवि गोलानी, मुनेश गौतम, राजू खोडेचा चेतन जसानी, रूपेश निंबार्ते, त्र्यंबक जरोदे यांच्यासह अन्य छायाचित्रकार व नागरिक उपस्थित मोठया संख्येत होते. विशेष म्हणजे वन्यजीव छायाचित्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत वन्यजीव छायाचित्रकार शिवराम यांनी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)