बनावट शिक्षक भरती प्रकरणात एकाला अटक
By Admin | Updated: May 6, 2015 01:03 IST2015-05-06T01:03:35+5:302015-05-06T01:03:35+5:30
राज्यातील ग्राम पंचायतींना मधात पाडून त्यांच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या नावावर कोट्यवधींची माया ...

बनावट शिक्षक भरती प्रकरणात एकाला अटक
आमगाव : राज्यातील ग्राम पंचायतींना मधात पाडून त्यांच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या नावावर कोट्यवधींची माया जमवून पसार होण्याच्या तयार असलेल्या मुंबई येथील एज्युकेशनल सर्वीसेस या संस्थेचा डाव उधळण्यात आमगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या भरती प्रकरणात एकाला अटक केली आहे. तर ही एक मोठी टोळी असल्याचा संशय असून या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ने शासनाची शिक्षक भरती असल्याचे भासवून राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उमेदवारांकडून अर्ज मागीतले होते. परंतु सदर भरती बनावट असल्याची माहिती होताच येथील काही उमेदवारांनी या संस्थेविरूध्द तक्रार नोंद केली होती. या बनावट भरती प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यात आमगाव पोलिसांनी यश आले आहे.
एज्युकेशनल सर्वीसेस या संस्थेने सर्व शिक्षा सेवा विस्तार अंतर्गत राज्यात सुशिक्षीत बेरोजगारांकडून शिक्षक भरतीची जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित केली होती. तर आरोपींनी सदर भरती प्रक्रियेत अधिकाधिक उमेदवारांनी सहभागी व्हावे यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त बारावी उत्तीर्ण मागविली होती. तसेच आवेदनाचा अंतिम दिनांक ३० एप्रिलपर्यंत दाखविण्यात आला होता. परंतु या भरती संदर्भात आमगाव येथील काही उमेदवारांना शंका बळावल्यामुळे त्यांनी सदर भरती संदर्भात शासनाच्या विविध विभागांकडून शहानिशा केली. यासंबंधात शासनाकडून अशाप्रकारे कोणतीच नोकर भरती नसल्याची माहिती पुढे आली.
तर शासनाच्या राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कडून सदर जाहिरातीशी विभागाचे कोणतेच संबध नसल्याचे प्रसिध्द पत्रक काढण्यात आले. त्यामुळे उमेदवारांना स्वत:ची फसवणूक झाल्याची जाण झाली. त्यांनी या संदर्भात आमगाव पोलिसांत ३० एप्रिल रोजी तक्रार दिली असता त्याआधारे भादंवी ४२०,४१९ प्रमाणे सदर संस्थेविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस विभागाने उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बी.डी.मडावी यांच्यासह पथक मुंबईला पाठविले. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपासाकरिता मुंबई येथे पथक पाठविण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)