मलेरियाने आठ तर डेंग्यूने दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: November 8, 2014 01:24 IST2014-11-08T01:24:42+5:302014-11-08T01:24:42+5:30
जिल्ह्यात डेंग्यूने नव्हे तर मलेरियाने थैमान घातले होते. परंतु मलेरिया झालेल्या रुग्णांना ही डेंग्यू झाल्याचा कांगावा जिल्हाभरात करण्यात आला.

मलेरियाने आठ तर डेंग्यूने दोघांचा मृत्यू
गोंदिया : जिल्ह्यात डेंग्यूने नव्हे तर मलेरियाने थैमान घातले होते. परंतु मलेरिया झालेल्या रुग्णांना ही डेंग्यू झाल्याचा कांगावा जिल्हाभरात करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया यंदा दुपटीने वाढल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१३ मध्ये मलेरियाचे ६० रुग्ण आढळले होते. मात्र चालू वर्षात १२१ रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा उद्रेक झाल्याचा वार्ता झडकत होत्या. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन डेंग्यूची माहिती काढल्यास महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा उद्रेक असल्याचे जाणवले. त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश नाही. परंतु गोंदिया जिल्ह्यात मलेरियाने थैमान घातले आहे. सन २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये दुपटीने मलेरियाचे रुग्ण आढळले. यात मृताची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. मागच्या वर्षी मलेरियाचे ६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र यावर्षी १२१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागच्या वर्षी डेथ फाल्सी फोरम रेट ३८ होता. मात्र यावर्षी १०० आहे. मागच्या वर्षी मलेरियाने चौघांचा मृत्यू झाला होता. मात्र यावर्षी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी चार वेळा मलेरियाचा उद्रेक झाला होता. परंतु यावर्षी १० वेळा मलेरियाचा उद्रेक झालेला आहे.
जिल्ह्यात डेंग्यू मागच्या वर्षीसारखा राहिला. मागच्या वर्षी डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला होता. याही वर्षी डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी डेंग्यूचा नऊ वेळा उद्रेक झाला होता. परंतु यावर्षी डेंग्युचा आठ वेळा उद्रेक झाला आहे. मागच्या वर्षी डेंग्युचे ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. यावर्षी ५३ जण डेंग्यूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. (तालुका प्रतिनिधी)