घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करुन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:36+5:302021-02-08T04:25:36+5:30
तिरोडा : महसूल विभागातर्फे घरकुल लाभार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन दिली जात आहे. ...

घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करुन द्या
तिरोडा : महसूल विभागातर्फे घरकुल लाभार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन दिली जात आहे. यासाठी महसूल विभागाने रेतीघाटसुध्दा निश्चित केले आहेत. मात्र, निश्चित केलेल्या रेतीघाटांवरुन रेती उपलब्ध होत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. महसूल विभागाने याची दखल घेऊन दुसऱ्या रेती घाटावरुन रेती उपलब्ध करुन देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभर रेतीघाटांचे लिलाव होऊ शकले नाहीत. याचा सर्वाधिक फटका निर्माणाधिन बांधकामांना बसला. घरकुल लाभार्थ्यांना रेती न मिळाल्याने त्यांच्या घरकुलांचे बांधकाम रखडले. परिणामी त्यांना घरकुलाचा हप्ता मिळणे कठीण झाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली. तर अर्धवट बांधकामामुळे त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली होती. घरकुल लाभार्थ्यांकडून याविषयीची ओरड सुरु झाल्यानंतर शासनाने त्याची दखल घेत त्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन दिली. याबाबतचे आदेश जिल्हा खनिकर्म विभागाने सर्व तहसील कार्यालयांना दिले आहेत. मात्र, अद्यापही पाच तहसील कार्यालयांनी याची अंमलबजावणी केलेली नसून, रेती उपलब्ध करुन दिलेली नाही. तर काहींनी अंमलबजावणी केली असली तरी रेतीघाट दूरचे दिल्याने लाभार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची वाळूची समस्या कायम आहे. त्यामुळे याची दखल घेऊन घरकुल लाभार्थ्यांना जवळचे रेतीघाट उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.