जलयुक्त अभियान यशस्वी करा
By Admin | Updated: May 11, 2015 00:27 IST2015-05-11T00:27:29+5:302015-05-11T00:27:29+5:30
येत्या पाच वर्षात टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही एक चालून आलेली संधी ...

जलयुक्त अभियान यशस्वी करा
अनुपकुमार यांचे प्रतिपादन : टंचाईसदृश स्थितीवर मात करण्याची संधी
गोंदिया : येत्या पाच वर्षात टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही एक चालून आलेली संधी समजावी. तसेच ग्रामस्थांनी या अभियानाला आपले अभियान समजून सहभागी व्हावे व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन नागपूरचे विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवार (दि.९) जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व धडक सिंचन विहीर कार्यक्रमाचा आढावा घेताना आयुक्त अनुपकुमार बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर आयुक्त हेमंत पवार, उपवनसरंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) बकूल घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त अनुपकुमार पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यापासून आढावा बैठकीला सुरूवात केली आहे. या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये, हा उद्देश असून या जिल्ह्याने अनेक प्रकल्प व योजनेत चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलयुक्त शिवार अभियान हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. मोहीम स्वरूपात हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात या अभियानाची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे. लोकसहभागावर हे अभियान अवलंबून आहे.
लोकांच्या मागणीनुसार माजी मालगुजारी तलावांची दुरूस्ती करण्यात यावी. यंत्रणांनी शेतकऱ्यांना तलावातील गाळाची उपयुक्तता पटवून द्यावी. त्यामुळे ते तलावातील गाळ शेतात टाकण्यास तयार होतील. गाळामुळे शेतातील पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवण क्षमतादेखील वाढणार आहे.
अनुपकुमार पुढे म्हणाले, जिल्ह्यात पाण्याचा वापर उपलब्ध सिंचन क्षमतेच्या २२ टक्के इतका आहे. तो वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजीपाला पिकात वाढ होण्यास मदत होईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे योग्यप्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त मजुरांंना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत विकासकामे करता येईल.
विशेष घटक योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांची निवड करावी. धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. शनिवारपासून सुरू करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि अटल पेंशन योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने काम करावे, असेही आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी जिल्ह्यात ९४ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली असून मागील पाच वर्षांत ज्या गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, अशा गावांची निवड या अभियानात करण्यात आल्याचे सांगितले. प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) बकूल घाटे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत, तर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पुराम यांनी धडक सिंचन विहिरी कार्यक्रमांबाबत माहिती दिली.
सभेला अंमलबजावणी यंत्रणाचे प्रमुख अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ३१६ कामे
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात जिल्हा महत्वपूर्ण टप्यावर आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ३१६ कामे सुरू आहे. गावातील नागरिकांचा या अभियानात सहभाग वाढला असून ट्रॅक्टरव्दारे शेतात गाळ टाकण्याचे काम करण्यात येत आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या वाढणार असून जलयुक्त शिवार अभियानामुळे रबी पिकांचे क्षेत्र वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अपर आयुक्त पवार यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तांत्रिकदृष्ट्या जलयुक्त अभियानाचे योग्य नियोजन करावे, असेही सांगितले.