यंत्रणांच्या योग्य समन्वयातून करा गणेशोत्सव व विसर्जन
By Admin | Updated: September 24, 2015 02:18 IST2015-09-24T02:18:03+5:302015-09-24T02:18:03+5:30
जिल्ह्यात सुरू असलेला गणेशोत्सव आनंद व भक्तिभावात साजरा करण्यासोबत गणेशमूर्तीचे विसर्जनसुद्धा कोणताही ...

यंत्रणांच्या योग्य समन्वयातून करा गणेशोत्सव व विसर्जन
विजय सूर्यवंशी : गणेशोत्सव व विसर्जनासाठीचे नियोजन आणि उपाययोजनांची आढावा बैठक
गोंदिया : जिल्ह्यात सुरू असलेला गणेशोत्सव आनंद व भक्तिभावात साजरा करण्यासोबत गणेशमूर्तीचे विसर्जनसुद्धा कोणताही वाद न करता गणेश मंडळांनी यंत्रणाशी योग्य समन्वय साधून करावे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २२ सप्टेंबर रोजी आयोजित गणेशोत्सव व विसर्जनासाठी करण्यात आलेले नियोजन व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी, गणेशोत्सवात अनेक मंडळाच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्याकरिता व केलेली सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. अशावेळी संबंधित मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या रात्रीच्या वेळी नदीवर वीज पुरवठा करण्यासाठी मंडळाने वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन घ्यावे. आवश्यक त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करावी. ज्या वाहनातून विसर्जनासाठी गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या वाहनांची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करुन घ्यावी.
तर गणेश विसर्जनाच्या ठिकाणी रजेगाव घाट, पांगोली नदीकाठावर व तलावांजवळ निर्माल्य टाकण्यासाठी कंटेनरची व्यवस्था करावी. त्यामुळे पाण्यात होणारे निर्माल्यांचे प्रदूषण टाळता येईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना विसर्जनाच्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून सहभागी करुन घ्यावे. तसेच विसर्जन करण्यात येणाऱ्या ठिकाणी वैद्यकीय पथकासह अॅम्बुलन्स, अग्निशमन दल, पोहणारे व्यक्ती तसेच आवश्यक त्या ठिकाणी नदीवर बॅरिकेट्सची व्यवस्था करावी असेही डॉ. सूर्यवंशी त्यांनी सुचविले.
तर पोलीस अधीक्षक मीना यांनी, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन घेण्याची विनंती करुनसुद्धा ज्या मंडळांनी अवैध वीज कनेक्शन घेतले अशा मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येईल. विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक ती प्रकाश व्यवस्था करावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. शेजारच्या राज्यातून अवैध मद्यपुरवठा जिल्ह्यात होणार नाही यासाठी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येईल. उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीच्या दुकानातील साठा रजिस्टरची तपासणी करावी असे सांगितले. सभेला सर्वच विभागांचे अधिकारी, पोलीस ठाण्यांचे निरीक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)