पिण्याच्या पाण्याची सोय करा
By Admin | Updated: March 24, 2017 01:40 IST2017-03-24T01:40:22+5:302017-03-24T01:40:22+5:30
ग्रामपंचायतच्या भोंगळ काराभारामुळे महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता अखेर शेत गाठावे लागत आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय करा
भीषण पाणीटंचाई : प्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सौंदड : ग्रामपंचायतच्या भोंगळ काराभारामुळे महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता अखेर शेत गाठावे लागत आहे. गावच्या चारही बाजूस पाण्याची साधने आहेत. तलाव, बोडी, नदी, नाले तर नदीवर पाणी अडविण्याकरिता बंधारेही आहेत. तरीही अवघ्या वेळेतच गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे. येथे वारंवार पाणी पेटण्याच्या बातम्या वृत्तपत्राद्वारे जनप्रतिनिधीपर्यंत पोहोचतात. परंतु या गावच्या पाणी टंचाईकडे शासन, प्रशासन व जनप्रतीनिधींचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
वर्षभरात जनतेला सहा महिने सुद्धा पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरविले जात नाही. सदर ग्रामपंचायतीकडे तीन मोठ्या पाणी टाकी असूनही जनतेला काही वेळा बादलीभर पाणी मिळते. मात्र ग्रामपंचायत वर्षापोटी पूर्ण कर वसुली करते. जनतेला मात्र वारंवार पाणी पुरवठा खंडीत केला जातो. मोटार बिघडणे, वीज पुरवठा कपात अशा अनेक समस्या जनतेला सांगितल्या जातात. मात्र अखेर असुविधाच हाती लागते. करीता संबंधीत ग्रामपंचायतने जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)