जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By Admin | Updated: December 4, 2014 23:12 IST2014-12-04T23:12:32+5:302014-12-04T23:12:32+5:30
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांना वाचा फोडण्यासाठी व भारतीय जनता पक्षाच्या असंवैधानिक सरकारच्या निषेधार्थ

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
सत्तारुढ पक्षाचा निषेध : तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
ंआमगाव : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांना वाचा फोडण्यासाठी व भारतीय जनता पक्षाच्या असंवैधानिक सरकारच्या निषेधार्थ आमगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार आमगाव यांना देण्यात आले.
काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे, धानाला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावे, विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी जात पडताळणी कार्यालय जिल्हास्तरावर करण्यात यावी, सातबारावर वर्ग दोनची नोंद कमी करुन वर्ग एकचे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदार यांना देण्यात यावे किंवा सहकार्यालय उघडण्यात यावे, संजय निराधार, श्रावणबाळ पात्र लाभार्थ्यांना त्वरित पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे, शेतकऱ्यांना थकीत विद्युत बिलाचे कनेक्शन कापने बंद करावे, बिलातील आगाऊ सर्व्हिस चार्ज बंद करण्यात यावे, तालुका कृषी कार्यालयामार्फत कमी किमतीत बियाणे व इतर साहित्य वाटपातील घोळाची चौकशी करण्यात यावी, तालुका भूमि अभिलेख कार्यालयाबद्दल त्वरित चौकशी करण्यात यावी, रबी हंगामाकरिता कोणत्या गावांना पाणी दिल्या जाणार याची चौकशी करण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम व जि.प. सार्वजनिक बांधकाम अंतर्गत झालेले निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे अंतर्गत बांधण्यात आलेले बंधाऱ्यांची साठवण क्षमता संपल्यामुळे अशा बंधाऱ्याची त्वरित चौकशी करुन चोरी गेलेल्या दरवाज्यांची चौकशी करण्यात यावी, मेनरोडवरील रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, आमगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना शोभेची वास्तू ठरली आहे, शेतकऱ्यांच्या जनावरांना वेळेवर उपचार होत नाही. अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाही, याची चौकशी करण्यात यावी. बनगाव, आमगाव बाजार समिती रस्त्यावरील मटन दुकान त्वरित हटविण्यात यावे, मानवी आरोग्याला धोका निर्माण होणार नाही यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकला जातो. व्यापाऱ्यांना अडतीयादारच्या नावाखाली लाभ देण्यात येते. शासनाकडून निर्माण झालेले बांधकाम फक्त व्यापाऱ्यांसाठी बनले आहेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी काय? याची चौकशी करण्यात यावी, अशा चौदा मागण्यांचे निवेदन तहसीलदार आमगाव यांना देण्यात आले.
यावेळी प्रभारी तहसीलदार बागडे यांना तालुका अध्यक्ष राजकुमार फुंडे,मधुसुदन मिश्रा, रामनिरंज़न मिश्रा, इसुलाल भालेकार, नितीन भसे, महेश उके, राजेंद्र चुटे, रामसिंग चव्हाण, संपत सोनी, भैया बावनकर, हुकूम बहेकार, रामेश्वर शामकुंवर, बबलू बिसेन, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)