माहुरकुडा जि.प. शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: July 2, 2015 01:46 IST2015-07-02T01:46:56+5:302015-07-02T01:46:56+5:30
येथून जवळच असलेल्या माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.१) शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ....

माहुरकुडा जि.प. शाळेला ठोकले कुलूप
अर्जुनी मोरगाव : येथून जवळच असलेल्या माहुरकुडा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.१) शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. यानंतर गटशिक्षणाधिकारी पी.एच. उरकुडे यांनी शाळेला भेट दिली. मात्र तोडगा निघू शकला नाही.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारला (दि.३०) ला जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाली. त्यानंतर बुधवारी (दि.१) मुख्याध्यापक बी.एन. मेश्राम हे सकाळी शाळेत आले. इतर शिक्षक मात्र शाळेत आले नाही. मुख्याध्यापकांनी शाळेचे फाटक व कार्यालय उघडले. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व उपस्थित गावकऱ्यांनी सकाळची शाळा आहे काय? अशी विचारणा केली. तेव्हा ते दुचाकीने निघून गेले.
शाळेच्या वेळेवर इतर शिक्षक हजर झाले. मात्र मुख्याध्यापकाच्या वर्तणुकीमुळे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. याची रितसर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली. यापूर्वी असे प्रकार शाळेत घडले आहेत. मात्र सुधारणा होत नाही जोपर्यंत मुख्याध्यापकांची बदली होत नाही तोवर शाळा कुलूपबंद राहील असा आक्रमक पवित्रा घेतला.
दुपारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. मुख्याध्यापकाची बदली करण्याचे अधिकार मला नाहीत, मी अहवाल पाठवितो. एक महिन्याचा कालावधी बदलीसाठी लागू शकतो, आधीच मुख्याध्यापक कमी असल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी त्यांना लेखी पत्र देण्याची मागणी केली त्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नकार दर्शविला.
जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत शाळा बंदच राहील असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम बावनकर यांनी सांगितले. मुख्याध्यापकाचे शाळेवर नियंत्रण नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचे स्थानांतर करण्याविषयी समितीने ५ मार्च रोजी ठराव पारित करुन वरिष्ठांना कळविले, मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा समितीने आरोप केला आहे. (तालुका प्रतिनिधी)