अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीवर येणारा महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:50+5:302021-02-05T07:46:50+5:30
बोंडगाव देवी : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या अलीकडेच निवडणुका पार पडल्या. निवडणुकीपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नव्हते. नुकत्याच झालेल्या ...

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीवर येणारा महिलाराज
बोंडगाव देवी : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या अलीकडेच निवडणुका पार पडल्या. निवडणुकीपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नव्हते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक व समोर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका अशा तालुक्यातील एकूण ७० ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती १२, अनुसूचित जमाती १६, नागरिकांचा मागास प्रवर्ग १९, सर्वसाधारण २३ याप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. याप्रसंगी तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, केवळराम वाढई, पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पंचवार्षिकामधील आरक्षण लक्षात घेऊन २०२० ते २०१५ नुसार सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. तालुक्यातील ७० ग्रामपंचायतमधून अनु.जाती ६, अनु. जमाती ८, नामाप्र ९, सर्वसाधारण १२ याप्रमाणे ३५ ग्रामपंचायतचे सरपंच महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायतमध्ये अरततोंडी/दाभना, कवठा, नवनितपूर, चान्ना/बाक्टी, कोहलगाव, कोरंभी,अनु.जाती महिलांसाठी राखीव ग्रामपंचायत याप्रमाणे चापटी, बोरटोला, खांबी, बोदरा, सिरेगाव, पवनी/धाबे, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतमध्ये येरंडी/देवलगाव, बाराभाटी, महागाव, झरपडा, येरंडी/दर्रे, कन्हाळगाव/साय., रामपुरी, गोठणगाव यांचा समावेश आहे. अनु.जमाती महिलांसाठी नवेगावबांध, खामखुर्रा, सोमलपूर, इळदा, झाशीनगर, बुधेवाडा, कान्होली, भरनोली या ८ ग्रामपंचायती आरक्षित ठेवण्यात आल्या. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी केशोरी, प्रतापगड, सिरोली, जानवा, वडेगावबंध्या, पिंपळगाव/खांबी, माहुरकुडा, बोरी, भिवखिडकी, सावरटोला या १० ग्रामपंचायती आरक्षित आहे. नामाप्र महिलांसाठी ताडगाव, बोंडगाव सुर., कोरंभीटोला, इटखेडा, बाक्टी, मांडोखाल, बोंडगावदेवी, निमगाव, परसोडी रैय्यत या नऊ ग्रामपंचायती आरक्षित ठेवण्यात आल्या. सर्वसाधारण प्रवर्गासाठी परसटोला, मुंगली, अरुणनगर, तुकुमनारायण, बोळदे करड, वडेगाव रेल्वे, कुंभीटोला, येगाव, गुढरी, रामनगर, गौरनगर अशा ११ ग्रामपंचायती आरक्षित ठेवण्यात आल्या असून सर्वसाधारण महिलांसाठी करांडली, महालगाव, सुकळी, देवलगाव/येरंडी, धाबेटेकडी/आदर्श, दाभना, विहिरगाव/बर्ड्या, तिडका, इसापूर, सिलेझरी, दिनकरनगर, मोरगाव अशा १२ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव ठेवण्यात आले.
.....
अनेकांचा झाला हिरमोड
गावकारभाऱ्यांचा मुखीया बनण्याचे बाशिंग बांधून असलेल्या गावातील अनेक दिग्ग़जांचा मनाप्रमाणे आरक्षण निघाले नसल्याने हिरमोड झाला आहे. आरक्षण निघण्यापूर्वीच काही स्वनाम नेते सरपंच पदाचे स्वप्न बघत होते. मात्र अखेरच्या क्षणी सरपंच पद कोसो दूर झाले. काही ठिकाणी बहुमत असून सुद्धा आरक्षित जागेवरील उमेदवारच उपलब्ध नसल्याने काहींना सत्तेपासून लांब राहावे लागणार आहे.
.....
निर्वाचित सदस्य पर्यटनाला
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील काही पॅनलचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भूमिगत व पर्यटन गेल्याचे चित्र दिसून येत आहे. सत्तेचे डोहाळे लागलेल्यांनी आपल्या पॅनलच्या सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवल्याचे बोलल्या जात आहे. गावाची कमान हातामध्ये राहण्यासाठी घोडेबाजार तेजीत आहे. बहुमत असतानाही काही पॅनलकडे सरपंच पदाचे उमेदवारच उपलब्ध नसल्याने राजकीय सारीपाटातील सत्तेवर पाणी फेरावे लागणार आहे.