‘माहेर घरात’ ३६३ गर्भवतींना सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:56 IST2017-05-04T00:56:42+5:302017-05-04T00:56:42+5:30
आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूती पूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेर घर’ योजना सुरू करण्यात आली.

‘माहेर घरात’ ३६३ गर्भवतींना सावली
शासन खर्च करण्यासाठी तत्पर : ५० टक्के महिलांनी घेतला लाभ
नरेश रहिले गोंदिया
आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूती पूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेर घर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे ५० टक्के महिलाच फक्त लाभ घेत आहेत. सन २०१६-१७ या वर्षात ३६३ महिलांनी ‘माहेर घर’ योजनेचा लाभ घेतला. या योजनेंतर्गत मागच्या वर्षी २ लाख ९९ हजार ४०० रूपये खर्च करण्यात आले आहे. या योजनेवर मंजूर निधीतून फक्त ३४.२१ टक्के निधी खर्च झाला आहे
बहुतांश आदिवासी लोक टेकडी भागात वास्तव्य करतात. जिल्ह्यात आदिवासींच्या बहुतांश गावात पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे गर्भवती महिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी सोय नाही. दुरध्वनी सेवा खंडीत, मोबाईलचीही समस्या होते. यामुळे योग्य उपचारासाठी अभावी आदिवासी गावात बाल व मात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. या स्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक आदिवासी गावात महिलांसाठी सन २०१०-११ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहेर घर योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्याच्या १३ प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘माहेर घर’ तयार करण्यात आले. सुरक्षित व आरोग्य संस्थेत प्रसूती करण्यासाठी गर्भवती महिला व तिच्या बालकाला राहण्याची सोय करून देण्यासाठी मोहर घर ही योजना अमंलात आणण्यात आली.
७३३ महिलांची पीएचसीत प्रसूती
जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात मुल्ला, मोहांडी, ककोडी, अर्जुनी मोरगावच्या केशोरी, गोठणगाव, कोरंभीटोला, महागाव, चान्ना बाक्टी, सडक अर्जुनीच्या शेंडा, पांढरी, सालेकसाच्या कावराबांध, दरेकसा व बिजेपार असे १३ ‘माहेर घर’ आहेत. या माहेर घरातील ७३३ आदिवासी महिलांची सन २०१६-१७ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली आहे. यापैकी ३६३ महिलांनी ‘माहेर घर’ योजनेचा लाभ घेतला आहे. मार्च महिन्यात ३९ महिलांची आरोग्य संस्थेत प्रसूती झाली. यात ४१ महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘माहेर घर’ योजनेच्या लाभार्थी महिलेला प्रसूतीच्या दोन-तीन दिवसापूर्वी माहेर घरात दाखल केले जाते. त्यांना सर्व सोयी सुविधा असलेले स्वतंत्र कक्ष देण्यात येते. गर्भवती मातेला दैनिक २०० रूपये दराने प्रत्येक दिवसाची बुडीत मजूरी दिली जाते. त्यांच्या जवेणाची सोय बचत गटाच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी बचत गटाला प्रत्येक लाभार्थ्याच्या मागे २०० रूपये दिले जातात.
जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी भागात पक्के रस्ते नाहीत. अश्या स्थितीत गर्भवतींना जोखीमेपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षीत प्रसूतीसाठी ‘माहेर घर’ योजना उत्तम आहे. बाल व माता मृत्यू थांबविण्यासाठी ही योजना आहे. गर्भवती बरोबर एका नातेवाईकाचीही सोय या ठिकाणी केली जाते. आदिवासी महिलांनी याचा लाभ घ्यावे.
अर्चना वानखेडे
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
(राष्ट्रीय आरोग्य अभियान), गोंदिया.