Maharashtra Election 2019 ; काट्याच्या लढतीत शिवणकर चौथ्यांदा विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:44 PM2019-10-05T22:44:33+5:302019-10-05T22:45:46+5:30

महादेव शिवणकर यांच्या प्रचारासाठी लालकृष्ण अडवानी आणि उमा भारतीसारखे केंद्रातील दिग्गज नेते आमगावला येऊन गेले. उमा भारती या थेट दिल्लीवरुन रेल्वे प्रवास करीत सालेकसा तालुक्याच्या कुणबीटोला या लोधी बहुल परिसरातल्या गावात येऊन गेल्या होत्या. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे सुध्दा भरत बहेकार यांच्या प्रचारासाठी थेट हेलीकॉफ्टरने आमगावात आले होते.

Maharashtra Election 2019 ; Shivankar won for the fourth time in the bout | Maharashtra Election 2019 ; काट्याच्या लढतीत शिवणकर चौथ्यांदा विजयी

Maharashtra Election 2019 ; काट्याच्या लढतीत शिवणकर चौथ्यांदा विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । निवडणूक १९९५ ची, आमगाव-देवरी मतदारसंघ,

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आमगाव विधानसभा मतदारसंघात १९९५ ची निवडणूक महादेवराव शिवणकर यांच्यासाठी करो या मरो सारखी होती. हरले तर पुन्हा कॉलेजात प्राध्यापक आणि जिंकले तर मंत्रीपद असे दोनच पर्याय राहीले होते. परंतु महादेवराव शिवणकर आणि भरत बहेकार या दोघांत शेवटपर्यंत रंगलेली निवडणूक कोणालाही झुकता माप देताना दिसत नव्हती. परंतु काट्याच्या लढतीत शेवटी शिवणकरांनी बहेकार यांच्यावर २२४८ मतांनी विजय मिळविला. निवडणूक जिंकताच राज्यातील युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री बनले.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत आमगाव मतदारसंघात एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले परंतु संपूर्ण निवडणूक शिवणकर आणि बहेकार यांच्यातच केंद्रीत राहीली. भाजप-काँग्रेसमध्ये ऐवढी थेट लढत आतापर्यंत झालीच नव्हती.
चिमूर क्षेत्राचे खासदार असताना १९९१ मध्ये देशात मध्यवर्ती निवडणुका झाल्या. त्यात शिवणकर, विलास मुत्तेमवारांकडून पराभूत झाले आणि पुन्हा भवभूती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली. परंतु तीन वेळा आमदार, एक वेळा खासदार राहिलेले महादेवराव राजकारणापासून जास्त काळ दूर राहू शकले नाही.१९९५ मध्ये भाजपने पुन्हा महादेवराव यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने पदासीन आमदार भरत बहेकार यांच्यावर पुन्हा डाव खेळला. त्या वेळी आमगाव येथील काही इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केली होती. परंतु पक्षाने व कार्यकर्त्यांनी बहेकार यांना प्रथम पसंती दिली.या दोन दिग्गज उमेदवाराव्यतिरिक्त इतर पाच अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले यामध्ये गोपीचंद नेवारे, सदाशिव आकरे, लेकचंद जांभुळकर, प्रभाकर कोल्हारे, नंदकिशोर साखरे यांचा समावेश होता.एकमेकांना कडवी झुंज देत असलेले शिवणकर यांनी बहेकार यांनी यावेळी आपल्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.यासाठी दोघांनी दिवसरात्र एक करुन केला होता.
महादेव शिवणकर यांच्या प्रचारासाठी लालकृष्ण अडवानी आणि उमा भारतीसारखे केंद्रातील दिग्गज नेते आमगावला येऊन गेले. उमा भारती या थेट दिल्लीवरुन रेल्वे प्रवास करीत सालेकसा तालुक्याच्या कुणबीटोला या लोधी बहुल परिसरातल्या गावात येऊन गेल्या होत्या. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे सुध्दा भरत बहेकार यांच्या प्रचारासाठी थेट हेलीकॉफ्टरने आमगावात आले होते. वरिष्ठ नेत्यांच्या आगमनाने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा उत्साहित झाले होते.
१२ फेब्रुवारी १९९५ ला मतदान कार्यक्रमात ८२ टक्के ऐवढे विक्रमी मतदान झाले. यात एकूण एक लाख ७९ हजार २५६ मतदारापैकी एक लाख ४८ हजार ७४६ मतदारांनी आपल्या मताधिकाराचा उपयोग केला. त्यापैकी महादेवराव शिवणकर यांनी ७० हजार ४०२ मते प्राप्त केली व ४८.७७ मतावर कब्जा केला. तर त्यांचे प्रतिद्वंदी भरत बहेकार यांनी ६८ हजार १५४ मते मिळवली. त्यांना ४७.२१ टक्के मते मिळून दोघांमध्ये फक्त दीड टक्यांचा फरक राहीला होता. अपक्ष गोपी नेवारे यांना २१४७, सदाशिव आकरे यांना १७२० तर इतर तीन उमेदवारांना एकूण १९३२ मते मिळाली. चार हजार ३८१ मते अवैध ठरविण्यात आली होती. निकालाअंती महादेवराव शिवणकर केवळ दोन हजार २४८ मतांनी विजयी झाले आणि या मतदारसंघातून विजयाचा चौकार लावला.राज्यात काँग्रेसला २८८ पैकी ८० जागेवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे भाजप-सेना युती करुन लढले होते. यात भाजपाला ६५ आणि शिवसेनेला ७३ जागा मिळाल्या. दोघांची संख्या १३८ झाली.
बहुमतासाठी १४५ आमदार लागत असताना अपक्ष आणि काँग्रेसची बंडखोरी करुन निवडून आलेल्या आमदारांचा समर्थन घेऊन मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात युतीचे सरकार स्थापन झाले. सोबतच विदर्भातून दोघांना कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले.यात आमगावचे महादेवराव शिवणकर आणि सावली मतदारसंघाच्या शोभा फडणवीस यांचा समावेश होता.

विधानसभेचा प्रवास - ८


गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री
महादेव शिवणकर यांना पाटबंधारे लाभ क्षेत्र मंत्री बनविण्यात आले.सोबतच भंडारा-नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री बनले. त्यांच्या कार्यकाळातच गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.दरम्यान काही काळ मंत्रीपदापासून दूर राहून पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेत त्यांना अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मोठी जबाबदारी मिळाली. तसेच १९९९ मध्ये गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा झाले. पाटबंधारे मंत्री असताना सिंचन क्षेत्रात अनेक कामे या भागात सुरु झाली.या काळातच अण्णा हजारे यांनी शिवणकर यांच्यावर आरोप करीत उपोषणाला बसले होते. परंतु शिवणकर यांनी स्वत:ला निर्दोष मानत मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. नंतर अण्णाने उपोषण मागे घेतले आणि पुन्हा शिवणकर अर्थमंत्री म्हणून मंत्रीमंडळात सामील झाले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Shivankar won for the fourth time in the bout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.