मॅजिक पीटकरणार जिल्ह्याला डासमुक्त
By Admin | Updated: April 27, 2017 00:53 IST2017-04-27T00:53:27+5:302017-04-27T00:53:27+5:30
गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी उन्हाळ्यात तिसऱ्या टप्यात ३३ गावे व वाड्या पाणी टंचाई ग्रस्त आढळल्या.

मॅजिक पीटकरणार जिल्ह्याला डासमुक्त
पहिल्या टप्यात ८० गावे : जिल्हाधिकारी नांदेड पॅटर्न राबविणार गोंदियात
नरेश रहिले गोंदिया
गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी उन्हाळ्यात तिसऱ्या टप्यात ३३ गावे व वाड्या पाणी टंचाई ग्रस्त आढळल्या. पाणी टंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी डासमुक्तीची संकल्पना साकारल्यास डासमुक्त गोंदिया बरोबर पाणी टंचाईची समस्या कायमची सोडविण्याचा रामबाण उपाय गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शोधून काढला.
जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये राबविलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी प्रखरतेने गोंदिया जिल्ह्यात करण्याचा चंग बांधला. वनाच्छादित असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी शेकडो लोकांना मलेरियाचा आजार होतो. या आजारामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागते.
या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात डासमुक्तीसाठी ग्राम पंचायतींना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. मॅजीक पीटच्या माध्यामातून गाव डासमुक्त करण्याची संकल्पना पुढे आणली आहे.
जो गाव हा उपक्रम राबविल त्या गावात शंभर टक्के निकाल मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रत्येक घरातील सांडपाणी पाईपद्वारे घरासमोरील टाकीत टाकून पाणी ते पाणी जमीनीत मुरविण्याची तजविज प्रत्येक कुटुंबाला व गावाला करावी लागेल. सांडपाणी साचून राहणार नाही याची काळजी ठेतल्यास गाव डासमुक्त होईल.
डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. गावात एकही साचलेले पाणी राहणार नाही तर त्या गावात डासाची उत्पत्ती होणार नाही. परिणामी गाव डासमुक्त होईल. डासमुक्तीच्या संकल्पनेने पाणी टंचाईवर सहजरित्या आळा बसेल. नांदेड येथे जिल्हाधिकारी असताना डॉ, अभिमन्यू काळे यांनी ५० गावे डासमुक्त केले. त्या डासमुक्तीच्या संकल्पनेला शंभरटक्के यशस्वी करणारा गाव नांदेड जिल्ह्याच्या माहुर तालुक्यातील लांजी हे गाव आहे.
दोन वर्षापूर्वी जमीनीच्या पाण्याची पातळी ६० ते ७० फुटावर होती ती पाण्याची पातळी या उपक्रमामुळे ८ फुटावर आली आहे. भर उन्हाळ्यात या गावात रोहयोच्या माध्यामातून नालीचे काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या नालीत आठ फुटावर पाणी लागले आहे. हाच प्रयोग गोंदिया जिल्ह्यात राबविला जाणार आहे.
डासांना अंडी घालण्यासाठी साचलेले पाणी लागते. त्यासाठी कुण्याही घरासमोर साचलेले पाणी राहू नये यासाठी शोषखड्डे तयार केले तर त्यातून डासमुक्त गाव होईल. तसेच प्रत्येक घरातील सांडपाणी जमीनीत मुरले तर त्या गावात दीड ते दोन वर्षातच पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. या उपक्रमासाठी स्वत:हून पुढे येणाऱ्या गावांची पहिल्या टप्प्यात निवड केली जाईल.
- अभिमन्यू काळे
जिल्हाधिकारी, गोंदिया.
एका वर्षात मिळेल रिझल्ट
डासमुक्त संकल्पना राबविणाऱ्या गावात प्रत्येक घरातील सांडपाणी पाईपद्वारे घरी तयार केलेल्या टाकीत टाकणे, ते पाणी जमीनीत मुरणे हे नित्यक्रम ज्या गावातील प्रत्येक घरात करण्यात आले तर डासमुक्त गाव म्हणून ते गाव पुढे येईल. वर्षभर हा उपक्रम ज्या गावाने नियमीत राबविला तर त्या गावाला निश्चीत रिझल्ट मिळणार आहे. एका कुटुंबाला दिवसाला ५०० लीटर पाणी लागत असेल तर एक कुटुंबाला महिनाभरात १५ हजार लीटर पाणी लागते. एका गावात ३०० कुटुंब असतील तर त्या गावात महिन्याकाठी ४५ लाख लीटर पाणी लागते. हे सांडपाणी पाणी जमीनीत मुरविले तर वर्षभरात ५ कोटी ४० लाख लीटर पाणी जमीनीत मुरेल. एकाच गावाचे पाणी एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जमीनीत मुरेल तर पाण्याची पातळी आपोआपच वाढेल.
मग्रारोहयोतून होणार गावात काम
घरातील सांडपाणी जमीनीत मुरविण्यासाठी तयार केलेल्या शोषखड्याला मॅजीक पीट हे नाव देण्यात आले. या खड्यामुळे दोन प्रकारचे जादू होणारे रिझल्ट समोर येत असल्याने त्याला मॅजीक पीट हे नाव देण्यात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हे शोषखड्डे तयार केले जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्यके तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील ८० गावात हे काम येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. या गावातील प्रत्येक घरातील सांडपाण्यासाठी ४ बाय ४ फूटाचा चा खड्डा तयार करण्यात येणार आहे. डासमुक्तीतून जलसंवर्धन करण्याचा पायंडा या उपक्रमातून मांडला जाणार आहे.