साखरीटोल्याला लाभले राजवैभव
By Admin | Updated: July 24, 2015 01:11 IST2015-07-24T01:11:46+5:302015-07-24T01:11:46+5:30
सध्या साखरीटोला (सातगाव) गावाला ‘अच्छे दिन’ लाभले आहेत. राजकारणाच्या सारीपाटावर साखरीटोला गावाला जिल्ह्याचे ‘लाल दिव्या’चे मुख्य पद ...

साखरीटोल्याला लाभले राजवैभव
साखरीटोला : सध्या साखरीटोला (सातगाव) गावाला ‘अच्छे दिन’ लाभले आहेत. राजकारणाच्या सारीपाटावर साखरीटोला गावाला जिल्ह्याचे ‘लाल दिव्या’चे मुख्य पद तसेच तालुक्याचे सुद्धा मुख्य पद मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदीआनंद आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या उषाताई मेंढे यांना मिळाले. तसेच सालेकसा पंचायत समितीेचे सभापतीपद हिरालाल फाफनवाडे यांना मिळाले. हे दोघेही साकरीटोल्याचे आहेत.
राजगादी मिळण्यासाठी राजयोगाची गरज असते. ज्याच्या हातात राजयोग त्याला राजगादी मिळते असे म्हटले जाते. याची नुकतीच प्रचिती आली. जिल्हा व तालुक्याचे प्रमुख पद या गावाला मिळाले. त्या दोन व्यक्तींचे राजकीय कोणतेही असले तरी आपल्या गावातील व्यक्तीला मान मिळाल्याचे समाधान गावात व्यक्त होत आहे. याचा गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे.
जि.प.च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता कोण स्थापन करणार, असा प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील जनतेला पडला होता. मात्र सर्व गणित बाजुला ठेवीत एकमेकाला पाण्यात पाहणाऱ्या काँग्रेस व भाजपाने गठबंधन करुन जि.प.मध्ये सत्ता स्थापन केली. योगायोग असा की काँग्रेसच्या पदमपूर क्षेत्रातून निवडून आलेल्या उषाताई मेंढे (साखरीटोला) जि.प.च्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या. दुसरीकडे सालेकसा पं.स.मध्ये काँग्रेस-राकाँ यांच्यात गटबंधन होऊन पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहून विजयी झालेल्या हिरालाल फाफनवाडे यांच्या गळ्यात तालुक्याचे सभापतीपद पडल्याने सालेकसा तालुक्यातील साखरीटोला गावाला राजवैभव मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकारणाचे केंद्र साखरीटोला बनले आहे. (वार्ताहर)