प्रधानमंत्री सडक योजनेतून निकृष्ट दर्जाचे बांधकाम
By Admin | Updated: October 28, 2014 22:59 IST2014-10-28T22:59:19+5:302014-10-28T22:59:19+5:30
सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते साकरीटोला - सातगाव रस्त्याचे बाधंकाम प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे.

प्रधानमंत्री सडक योजनेतून निकृष्ट दर्जाचे बांधकाम
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते साकरीटोला - सातगाव रस्त्याचे बाधंकाम प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्ता उखडला असून वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर कामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत गांधीटोलावासीयांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, साकरीटोला ते सालेकसा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुर्दशा झाली होती. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या साकरीटोला, सातगाव, गांधीटोला, दुर्गटोला, गिरोला, भजीयादंड तसेच इतर गावातील नागरिकांना सालेकसा येथे तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या कामानिमित्त नेहमीच येणे-जाणे करावे लागते.
परंतु सदर रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्रास सहन करावा लागत होता. वाहन धारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असे. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी अनेकदा लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती. त्यानुसार तिरखेडी ते साकरीटोला रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेंतर्गत मंजुरी मिळाली व नुकतेच काम सुरू झाले. मात्र सदर कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाची माती मिश्रीत खडी व मुरमाऐवजी पहाडीवरील मलब्याचा वापर केला जात असल्याने काम सुरू असतानाच ठिकठिकाणची गिट्टी उखडली आहे. त्यामुळे सदर मार्गावरून ये-जा करणे त्रासदायक ठरले आहे.
सदर कत्राटंदार अंदाज पत्रकानुसार चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर न करता मोठ्या प्रमाणात पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या व कमी किमतीच्या साहित्यांचा वापर करून सदर मार्गाची ऐसीतैसी करीत आहे. जेव्हा की सदर मार्गावरून जवळच असलेल्या गांधीटोला, रूगांटोला, कडोतीटोला येथे चांगल्या दर्जाची खडी आणि पानगाव व कवडी येथे चांगल्या दर्जाचे मुरूम मोठ्या प्रमाणात उपल्बध आहे.
असे असतानासुध्दा कंत्राटदार व संबंधित विभागाचे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आह. ग्रामपंचायत गांधीटोला येथील सरपंच तसेच पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून काम बंद करा किंवा कामाता उत्तम दर्जाच्या साहित्याचा वापर करा, अशी मागणी केली आहे. सदर मार्गावरील बांधकामात चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर न केल्यास काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)