प्रियकराच्या संशयाने प्रेम झाले रक्तरंजित
By Admin | Updated: November 9, 2016 01:44 IST2016-11-09T01:44:57+5:302016-11-09T01:44:57+5:30
‘ते’ शेजारी-शेजारीच राहणारे. दररोज नजरेला भिडणारी नजर आणि त्यातून एकमेकांबद्दल वाढलेले आकर्षण यातून त्यांचे प्रेम कधी जुळले त्यांनाही कळले नाही.

प्रियकराच्या संशयाने प्रेम झाले रक्तरंजित
नरेश रहिले गोंदिया
‘ते’ शेजारी-शेजारीच राहणारे. दररोज नजरेला भिडणारी नजर आणि त्यातून एकमेकांबद्दल वाढलेले आकर्षण यातून त्यांचे प्रेम कधी जुळले त्यांनाही कळले नाही. ‘नजरेत ध्यास तुझा, स्वप्नात ध्यास तुझा, सजने सावरू कसा ग, तळमळतो जीव माझा’ अशी त्या युवकाची अवस्था झालेली. पण ज्या युवतीवर असा जीव लावला तिलाच आपण एका क्षणात कायमचे संपवून टाकू असा विचार त्याने कधी स्वप्नातही केला नसेल, मात्र तिच्याबद्दल संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले आणि त्या दोघांसोबत त्यांच्या कुटुंबियांच्याही भावी स्वप्नांची राखरांगोळी झाली.
१५ दिवसांपूर्वी घिवारी परिसरात देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून मृतावस्थेत आढळलेल्या युवक-युवतींनी एकच खळबळ उडाली होती. या प्रेमविरांच्या अशा दुर्दैवी अंतामागील कहाणी काय होती याचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. पोलिसांनी केलेल्या तपासात प्रियकराच्या डोक्यात शिरलेले संशयाचे भूत हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातूनच त्याने गोळ्या घालून आधी प्रेयसीचा खून केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
गोंदियाच्या आंबाटोली फुलचूर येथे राहणारे ते प्रेमीयुगुल. आकांत वैद्य (३०) असे प्रियकराचे नाव तर काजल मेश्राम (२२) असे प्रेयसीचे नाव. एकामेकाच्या शेजारी राहणाऱ्या या मुला-मुलींमध्ये अडीच वर्षापूर्वी प्रेम जुळले. काजल इंजिनियरींगच्या अंतीम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे येथे गेली. काजलने करीअर घडविण्याचा चंग बांधला व तिने पुण्यात ग्रंथालयात जाऊन अभ्यास करणे सुरू केले. ग्रंथालयात गेल्यावर फोन उचलण्यास मनाई असते. ती अभ्यास करायला गेल्यावर आकांतचा तिला फोन जायचा. त्यावर ती फोन न उचलता फोन काटायची. परंतु ती फोन उचलत नाही म्हणून तिचे कुणासोबत अफेअर तर नाही ना, असा संशय आकांतला येऊ लागला.
काजल कुणा-कुणासोबत बोलते याची माहिती आकांतने काढली. त्यात भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील एका युवकाचे नाव समोर आले. त्याच्याशी काजलचे प्रेमसंबंध आहेत असा आकांतला संशय होता. परंतु तो तरूण काजलला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करीत असायचा असे काजल व त्या तरूणाचेही म्हणणे होते. काजलवर जीवापाड प्रेम करणारा आकांत एवढ्या टोकावर जाणार याची कल्पना कुणालाच नव्हती. त्यांच्या प्रेमातून संसार थाटला जाईल असे घरच्यांनाही वाटत होते. अनेक परीक्षा देऊनही नोकरी लागत नव्हती. तरीही जीद्द न सोडता आकांतने रेल्वेच्या लोकोपायलटची परीक्षा दिली. या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. परंतु वैद्यकीय चाचणी न झाल्याने त्याला नियुक्तीपत्र मिळाले नव्हते.
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेलेल्या काजलचे दुसऱ्या तरूणाशी प्रेमसंबध जुळले असावे त्यामुळेच ती आपला फोन उचलत नाही ही शंका आकांच्या मनात होती. यातूनच त्यांच्या प्रेमाला खिंडार पडले. त्या दोघांचे फोनवर कधी संभाषण झाले तर ते दोघांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. त्यांचे बोलणेही काही काळासाठी बंद झाले. अभियांत्रीकीच्या अंतीम वर्षाच्या काही विषयात काजल नापास असल्याने त्या विषयाचे पेपर देण्यासाठी गोंदियात आल्यावर त्या दोघांना एकमेकांसोबत बोलायची मनोमन इच्छा होती. परंतु फोनवर वादावादी झाल्यामुळे दोघेही बोलत नव्हते. परंतु आकांतने पुढाकार घेत काजलसोबत संवाद साधला. काजलही त्याच्यासोबत चांगलीच बोलली. दोघाच्या मनात असलेले कटू बाहेर काढण्यासाठी आपली भेट बाहेर करू असे दोघांचे ठरले.
१८ आॅक्टोबरच्या रात्री दोघेही मोटारसायकलने गोंदियापासून १० किमी अंतरावर असलेल्या घिवारी परिसरात भेटण्यासाठी निघाले. दोघेही तिथे गेल्यावर पुन्हा त्यांची शाब्दीक चकमक उडाली यात आकांतने काजलवर गोळी झाडून तिचा खून केला. त्यानंतर लगेच स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाकडे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार संजीव गावडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश घुगे व कर्मचारी गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या प्रेमी युगुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाला आणले.
आकांतने आधीच केले होते प्लँनिंग
या प्रकरणाची चौकशी करताना आकांतने हे कृत्य करण्याचा चंग आधीच बांधला होता हे तपासात निष्पन्न झाले. त्याने स्वत:च्या घरी एका वहीवर आईच्या नावाने लिहीलेल्या पत्रात आपला प्रेमभंग झाल्याने सदर कृत्य करीत असल्याचे म्हटले आहे. ‘तू माझी नाही तर कुणाचीच नाही’ असे आकांतचे म्हणणे होते.
मोबाईलवर संपर्क साधून जवळीक साधता येते, पण मोबाईलवर वेळेवर न मिळालेल्या उत्तरामुळे अनेकदा भावना दुखावतात. ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थीनीला ग्रंथालयात फोन उचलण्याची मुभा नसल्यामुळे ती प्रियकराचा फोन कापत होती. मात्र कापल्या जाणाऱ्या फोनमुळे आपल्याला आपली प्रेयशी टाळत असल्याचा गैरसमज आकांतने केला. यातून तिचा खून करण्याची कुबुद्धी त्याला सुचली. सुंदर संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रेमाचा अंत अखेर रक्तरंजित झाला.